खुनाच्या आरोपीच्या वाढदिवसासाठी जेलबाहेर फटाके फोडणाऱ्या दोघांची पोलिसांनी काढली धिंड!

ऑगस्ट 27, 2026 6:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा कारागृहाच्या कंपाउंड वॉलवर चढून फटाके फोडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात तपास केला. २० ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ संबंधितांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या खुनाच्या आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आकाश सपकाळे हा खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असून, त्याच्यावर तब्बल नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

akashsapkale

फटाक्यांच्या ठिणग्या कारागृहात

२० ऑगस्ट रोजी काही जण जळगाव जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ गेले होते. यावेळी कंपाउंड वॉलवर चढून फटाके फोडण्यात आले. फटाक्यांच्या ठिणग्या कारागृहाच्या संरक्षण भिंतीच्या आत गेल्याने कैद्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची तसेच कारागृहातील मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. तपासातून फटाके फोडण्यामागील कारण समोर आल्यानंतर संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली.

दोघांना अटक

या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जिल्हा कारागृहामार्फत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सीआर क्रमांक २७०/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया आणि शुभम जाधव यांना अटक केली आहे. कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणाच्या संरक्षक भिंतीजवळ स्फोटक पदार्थ असलेले फटाके फोडून कैद्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली आहे.

काय आहे कलम ३२६?

बीएनएस कलम ३२६ अंतर्गत आग किंवा स्फोटक पदार्थाचा वापर करून मालमत्तेचे नुकसान करण्यासंदर्भात तरतूद आहे. या कलमांतर्गत दोष सिद्ध झाल्यास जन्मठेप किंवा दहा वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now