⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बुरखा घालून आले दोघे, कोर्टात करणार होते ‘खून का बदला खून’ पण..

बुरखा घालून आले दोघे, कोर्टात करणार होते ‘खून का बदला खून’ पण..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । भुसावळात २०२० मध्ये झालेल्या खून प्रकरणात गेल्यावर्षी ‘खून का बदला खून’ राबवित नशिराबाद येथे धम्मप्रिय सुरडकर याची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आज दोघे पिस्तुल घेऊन बुरखा घालून जिल्हा न्यायालयात आले होते. जळगाव शहर पोलिसांना वेळीच गुप्त बातमी मिळाल्याने मोठी घटना टळली असून एकाला पिस्तुलसह अटक करण्यात आली आहे.

भुसावळात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून ११ ऑक्टोबर २०२० रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाच्या डोक्यात रॉड घालून त्याचा खून करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयीत धम्मप्रिय मनोहर सुरडकर (वय-१८, रा.पंचशील नगर) याला पोलिसांनी अटक करीत कारागृहात रवानगी केली होती. दि.२१ सप्टेंबर २०२१ रोजी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटून दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी तो वडील मनोहर आत्माराम सुरडकर (वय-४५) यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच.१९.एव्ही.९६५६ ने घरी जात होता. नशिराबाद येथे सूनसगाव रस्त्यावर एका टपरीवर थांबले असताना तीन तरुणांनी दोघांवर हल्ला केला होता. धम्मप्रिय याच्यावर केलेल्या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर मनोहर सुरडकर जखमी झाले होते.

खुनाच्या गुन्ह्यात नशिराबाद पोलिसांनी चौघांना अटक केली होती त्यापैकी दोघे सध्या जामिनावर असून शेख शमीर उर्फ समीर उर्फ भांजा शेख जाकीर वय-२१ आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन वय-२१ या दोघांची सुनावणी सुरू आहे. सोमवारी दुपारी २ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांवर न्यायालयातच गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा डाव धम्मप्रिय याचे वडील मनोहर यांनी रचला होता. सोमवारी ते तयारीनिशी न्यायालयात पोहचले मात्र गुन्हा घडण्यापूर्वीच शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

असा रचला कट..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर सुरडकर याने मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चौघांच्या मदतीने एक कट रचला होता. सोमवारी समीर आणि रेहान यांना जिल्हा न्यायालयात आणण्यात येणार होते. तत्पूर्वी मनोहर याने दोन गावठी बनवटीचे पिस्तूल खरेदी केले होते. सोमवारी मनोहर आणि एक साथीदार बुरखा परिधान करीत महिलेच्या वेशात भुसावळहून कालीपिलीने जळगावात आले. बुरखा, महिलेचे बूट आणि पर्स घेऊन दोघे जिल्हा न्यायालयाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर पोहचले.

शहर पोलिसांनी उधळला कट..
बुरखा परिधान केलेल्या वेशात दोघे जिल्हा न्यायालयाबाहेरील श्री गुरुदत्त मंदिराच्या ओट्यावर बसले होते. मुस्लीम व्यक्ती मंदिरावर बसले होते आणि त्यांचे हावभाव संशयास्पद वाटत असल्याने एका व्यावसायिकाला संशय आला. व्यावसायिकाने लागलीच शहर पोलिसांना कळविले आणि दोघांना विचारणा केली. मनोहरसोबत असलेल्या एकाला संशय आल्याने पळ काढला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी कर्मचारी तेजस मराठे, नरेंद्र ठाकरे, गजानन बडगुजर, योगेश इंधाटे, उमेश भांडारकर यांनी धाव घेतली तसेच कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखा कर्मचारी परमेश्वर जाधव हे देखील पोहचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पर्स तपासली असता त्यात एक पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुस मिळून आले.

मोठा गुन्हा टळला, ‘एसपी’कडून कौतुकाची थाप..
जळगाव जिल्हा न्यायालयात आवारात होणार असलेला मोठा गुन्हा रोखल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजनपाटील हे तात्काळ शहर पोलीस ठाण्यात पोहचले. गुन्ह्याची सर्व माहिती घेत पोलीस अधीक्षकांनी सर्व टीमचे कौतूक केले आणि रिवार्ड देण्याचे देखील आश्वासित केले. सर्वांशी भेट घेत अशीच कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित देखील केले. शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील चौकशी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.