⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

शिंदेंचा वचक संपला! उपनिरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्याची दालनातच जुंपली, पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । जळगाव शहरातील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांचा वचक संपल्याचे पहावयास मिळत आहे. शनिवारी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यात वाद झाल्याचे समजते. सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार स्विकारल्यापासूनच त्यांच्या नावाच्या मोठ्या चर्चा आहेत. शिस्त आणि स्वभावामुळे अनेक कर्मचारी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्याप्रमाणात अवैध धंदे सुरू असून त्यावरून नेहमीच वाद देखील होत असतात. पिंप्राळा हुडको, समतानगर भागातील वाद तर नित्याचेच आहेत. निरीक्षक शिंदेंचा कृपा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्यच नाही. रात्रभर होणारी अवैध वाळू वाहतूक तर नित्याचीच झाली आहे.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचा प्रत्यय शनिवारी आला. पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख व पोलीस कर्मचारी अनमोल पटेल यांच्यात वाद झाला. पोलीस निरीक्षकांच्या दालनातच हा वाद झाल्याचे समजते. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी याप्रकरणी देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाब्दिक वाद झाल्याचे गुप्ता यांना सांगितले.

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली असून पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या दालनात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील गुप्ता यांनी केलेल्या एका तक्रारीवरून तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झाली होती मात्र पोलीस निरीक्षकांवर काहीही कारवाई झालेली नाही.

जळगाव लाईव्हला मिळालेल्या माहितीनुसार वीर सावरकर नगरातील गीताई अपार्टमेंटचे काही रहिवासी आणि नवकार इंटरप्रायझेस श्रीकृष्ण कॉलनी येथील विशाल राजेंद्र चोपडा यांनी ऍड.केदार भुसारी यांच्यामार्फत नूर मोहम्मद अब्दुल गफूर व मरियमबी अब्दुल गफूर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अर्ज केलेला होता. सदर प्रकरणी अर्ज चौकशी अंमलदार अनमोल पटेल हे गैरअर्जदारांची बाजू घेत होते. तक्रारदार यांच्या हा प्रकार लक्षात त्यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करीत अनमोल पटेल यांच्याकडून तपास काढून घेण्याची मागणी केली होती.

सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी अर्जाची दखल घेत तपास काढून घेण्याचे सांगितले. शनिवारी याच प्रकरणात पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख आणि कर्मचारी अनमोल पटेल यांना दालनात बोलाविले होते. दोघांमध्ये यावेळी जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद वाढल्याने एकाने दुसऱ्यावर पाणी बाटली आणि खुर्ची देखील फेकून मारल्याचे समजते. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.