जळगाव लाईव्ह न्यूज । महायुतील भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन करण्यात येत असून जळगाव मध्ये ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वाजतगाजत ‘प्रतिकात्मक अंतयात्रा’ काढण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही यात्रा आणली. या वेळी सरकारविरोधी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा जाळण्यास आडकाठी करण्याचा प्रयत्न केला असता मात्र शिवसैनिकांनी पारंपरिक पद्धतीने आंदोलन करून पुतळ्याला अग्निडाग दिला.

यादरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे व मंत्री संजय शिरसाठ यांचे मुखवटे लावून पत्ते व पैशांची बॅग घेऊन या मंत्र्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळून व पैसे उडवून महायुतीतील भ्रष्ट नेत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. जिल्हाभरातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी सहभाग घेत महायुतीतील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.












