⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

Bhadgaon : 4 महिन्याच्या चिमुकल्याचा अंगावर दिसला विषारी नाग, आईने नागाला बाळापासून लांब फेकले, पण..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । भडगाव तालुक्यातील महिंदळे इथे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे असलेली एक घटना घडलीय. रात्री झोपेत असताना आईला आपल्या चार महिन्यांच्या चिमुकल्याचा रडण्याचा आवाज आला…झोपेतून उठून तिने पहिले तर चक्क चिमुकल्याचा अंगावर नागोबा दिसला. आपल्या जीवाची पर्वा न करता क्षणार्धात मातेने ह्या विषारी नागाला बाळापासून लांब फेकले. पण तेवढ्यात नागाने तिच्या हाताला दंश केला.

दरम्यान, नागाने दंश केलेल्या मातेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी गावातील महादेवाला साकडे घातले आणि मंदिराचा गाभारा संपूर्ण पाण्याने भरून चिमुकल्याच्या मातेला वाचवावे, अशी प्रार्थना देवाकडे केली

नेमकी काय आहे घटना?
महिंदळे येथे भिकन नरसिंग राजपूत हे वास्तव्यास असून बांभोरी ता. एरंडोल येथील सासर असलेली भिकन राजपूत यांची मुलगी ज्योती ही काही महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी माहेरी महिंदळे येथे आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिला मुलगा झाला. बाळ व आई सुखरूप होते. मात्र गेल्या आठवड्यात भयंकर घटना घडली.

रात्री घरात आई आणि तिचा 4 महिन्याचा चिमुकला झोपला होता. मात्र रात्री अचानक बाळ रडायला लागले. आईला बाळाच्या आवाजाने जाग आली अन् तिने पाहिले तर चिमुकल्याच्या अंगावर चक्क साप होता. आपल्या जीवाची पर्वा न करता क्षणार्धात तिने ह्या सापाला बाळापासून लांब फेकले. पण तेवढ्यात सापाने तिच्या हाताला दंश केला.

यात ज्योती ही अत्यवस्थ झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने ज्योतीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्रकृती खालावल्याने तेथून पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सर्प अतिविषारी असल्यामुळे ज्योती हिची मृत्यूची झुंज सुरू होती. ज्योती लवकर बरी व्हावी म्हणून गावातील महिलांनी महादेवाला साकडे घातले. मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्याने भरला. आणि ज्योतीला वाचवावे…यासाठी देवाकडे प्रार्थना केली. मागील काही दिवसांपासून आईची मृत्यूशी झुंज अखेर डॉक्टरच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वी ठरली.