⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

शोध हरवलेल्या सुखाचा; चाळीसगावात जेसीआय’तर्फे अनोखा उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात हल्लीची पिढी एकलकोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला जगण्याचे खरे आनंद मांडणारे भारतीय पारंपारिक खेळांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खेळ विश्वात विद्यार्थी चांगलेच रमले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जेसीआय झोन १३ चे माजी झोन अध्यक्ष जेसी निलेशजी गुप्ता (सी.ए.), सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, स्वप्नपूर्ती अकॅडमी चे संचालक जेसी आकाश धुमाळ, माजी अध्यक्ष जेसी खुशाल पाटील, जेसी प्रितेश कटारीया, अध्यक्ष जेसी धर्मराज खैरनार, आयपीपी जेसी डॉ. प्रसन्न अहिरे, प्रकल्प प्रमुख जेसी नितीन कोतकर, सचिव जेसी मयूर अमृतकार आदी उपस्थित होते.

चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई देशमुख उद्यानात जेसीआय चाळीसगावतर्फे ‘शोध हरवलेल्या सुखाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा माजी अध्यक्ष जेसी निलेशजी गुप्ता यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, जसे शरीराने सुदृढ राहण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो तसेच मनाने सुदृढ राहण्यासाठी आपण खेळ खेळलो पाहिजे यामुळे तणाव कमी होऊन माणूस निरोगी आयुष्य जगतो. मोबाईलचे आहारी न जाता दिवसातून किमान एक तास तरी खेळासाठी द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक आकाश धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, बालपणातच खरे आयुष्य जगायला मिळते. त्यामुळे शिक्षणाबरोबरच जगायलाही शिका, आपल्या भौतिक विश्वातून बाहेर पडून समाजामध्ये काय सुरू आहे याच्याकडेही लक्ष द्या. खेळांचे मैदान मोबाईलमध्ये आणून एकटे पडू नका त्यासाठी खर्‍या मैदानांवर जाऊन खेळा, मौज करा. पालकांनीही आपल्या मुलाला रोज खेळायला पाठवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गोट्या, लगोरी, चकरी, मामाच पत्र हरवलं, लंगडी, आंधळी कोशिंबीर, टायर टायर, रस्सी खेच, गोणी उड्या असे विविध पारंपारिक खेळ कसे खेळतात याविषयी प्रत्यशिक करून मार्गदर्शन जेसी आकाश धुमाळ यांनी केले. विद्यार्थ्यांनी काही तासांसाठी आपल्या मोबाईल मधून बाहेर पडत खेळांचा मनमुराद आनंद लुटला. तर पालकांनीही यात आपला सहभाग नोंदवत खेळांची मौज केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात आज आम्हाला जगावेगळा आनंद मिळाला असे सांगत यापुढेही असे कार्यक्रम घेण्याची विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जेसी धर्मराज खैरनार यांनी तर सूत्रसंचालन जेसी चंद्रकांत ठाकरे आभार सचिव जेसी मयूर अमृतकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेसी नरेंद्र शिरुडे, जेसी मनोज पाटील, जेसी वकार बेग, जेसी महेंद्र कुमावत, जेसी साहिल दाभाडे, जेसी आतिश कदम, जेसी सुवालाल छाजेड, जेसी सलमान खान, बापूसाहेब खैरनार, कमलेश पवार यांसह सर्व जेसीआय माजी अध्यक्ष, सदस्य यांनी परिश्रम घेतले.