जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । सध्या महागाई डोकंवर काढत असून दिवसेंदिवस उपयोगी वस्तू महागात आहे. या महागाईचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. दरम्यान, बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या लाडक्या ‘सर्जा राजा’चा साजश्रुंगार करण्यासाठी धडपडत आहे. मात्र, अशातच बैल सजावटीचे साहित्य महागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
यंदा साजश्रुंगार साहित्याच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसते आहे.
उद्या म्हणलेच १४ सप्टेंबरला बैल पोळा सण साजरा केला जाणार. यानिमित्तने बाजारपेठही सजली आहे. बैलांना पोळ्यानिमित्त सजावट करण्यासाठी आकर्षक वस्तू विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. मात्र, या सर्व साहित्यांच्या कच्च्या मालाची दरवाढ व त्यावर लागलेल्या जीएसटीमुळे बैलांचे श्रृंगार साहित्य १० ते २० टक्क्यांनी महागले आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर महागाईची ‘झूल’ दिसून येत आहे. नुकताच पाऊस बरसल्याने यापूर्वी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे सर्जाराजासाठी ‘होऊन जाऊ दे खर्च’, म्हणत शेतकरी सज्ज झाला आहे.
असे आहेत साहित्याचे दर
माटुट जोड : १५० ते २०० रुपये नग
मोरकी : ५० ते १६० रुपये एक नग
रेशम कासरा : १२० रुपये ते ४०० रुपयेपर्यंत
पितळी तोडे : १००० रुपये किलो
पितळी घोगर : १००० ते १२५० रुपये किलो
पितळी घंटी :८०० ते १००० रुपये किलो