⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | जळगाव जिल्हा | बातमी तशी जुनी पण… या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

बातमी तशी जुनी पण… या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । आजच्या काळात सोशल मिडीयाचे महत्व अधोरेखित होत असले तरी वृत्तपत्रात छापून येणारी बातमी ही आजही विश्वासार्ह मानली जाते. वृत्तपत्रातील बातमी मग ती कितीही जुनी असली तरी तिची महत्ता कालातीत आहे. ही बातमी एखाद्याचे आयुष्य घडवते तसेच ती एखाद्याचे आयुष्य रसातळालाही नेऊ शकते. यावर भाष्य करणारे नाटक आज (दि.२९) महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर होणार आहे.

हे नाटक माणसाच्या सनातन वृत्तीवर भाष्य करणारे नाटक आहे. माणसामाणसातील संघर्ष हा अपरिहार्य आहे. मग तो कुठल्याही कारणांनी असो. संघर्षाशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. प्रा.पुरुषोत्तम सरपोतदार उच्चभ्रू साहित्यिक व समाजातील अग्रगण्य व्यक्तिमत्व व अतिसामान्य असणारा अनिकेत यांच्यातील संघर्ष या नाटकात आहे. नीती – अनीती विचार न करता केलेले कार्य व त्यात होरपळला जाणारा सर्वसामान्य माणूस यांच्यातील संघर्ष वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या माध्यमातून मांडत प्रसंगागणिक उत्कंठा वाढवणारे हे नाट्य आहे.

या नाटकाचे लेखक डॉ.हेमंत कुलकर्णी असून, दिग्दर्शन अपूर्वा कुलकर्णी यांचे आहे. यात ऋषिकेश धर्माधिकारी व अम्मार मोकाशी यांच्या भूमिका असून, नाटकासाठी नेपथ्य रसिका कुलकर्णी, प्रकाशयोजना लेखराज जोशी, पार्श्वसंगीत आशिष राजपूत, रंगभूषा योगेश शुक्ल, वेशभूषा हर्षल पवार यांची आहे. किरण म्हस्के, प्रसाद कौतिकवार, बापू महाले यांची रंगमंच व्यवस्था आहे. नाटकासाठी तिकीट दर रु.१५ व रु.१० असून, जळगावकर रसिकांनी या नाटकास उपस्थिती देत या नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सादरकर्ती संस्था रंगशाळा जळगाव तर्फे करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.