जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । दारू पिणे हे वाईट असल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण याच दारूमुळे तब्बल ८ वर्षांपूर्वी झालेल्या कुणाचा उलगडा झाला आहे. दारूच्या नशेत संशयिताने आठ वर्षांपुर्वी केलेल्या खुनाचे गुपित बरळल्याने त्याच्या हाती बेड्या पडल्या. वाल्मीक रमेश चौधरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
संशयित वाल्मीक रमेश चौधरी हा आपल्या आईसोबत सुरतमधील पांडेसरा या परिसरात राहत होता. त्याच भागात उत्तर प्रदेशातील अशोक यादव नावाची व्यक्ती राहत होती. अशोक यादव हा वाल्मीक चौधरीची आई लताबाई यांना त्रास देत होता. ही बाब वाल्मीकला खटकत होती. त्याने अशोकला समजावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, मात्र अशोक जुमानत नसल्याने त्याने, आपले मित्र पिंटू आणि भैय्या यांना पाच हजार रुपये देऊन अशोकला धमकावण्याची योजना आखली. वाल्मीकने अशोक यादाव याच्याशी मैत्री केली आणि दोन्ही मित्रांच्या मदतीने त्याला दारू पाजत सुरतहून अमळनेरला आणले. अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराच्या परिसरात अशोक याच्याशी वाल्मीकसोबत बाचाबाची झाली. त्याच वादात वाल्मीक याने अशोक यादव याचा दगडाने ठेचून खून केला होता. दरम्यान, १८ मे २०१४ रोजी सायंकाळी ही घटना उघड झाली होती. त्यावेळी मृताची ओळख पटली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून नंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
असा झाला उलगडा
१५ दिवसांपूर्वी संशयित वाल्मीकने दारूच्या नशेत सुरत येथे खून केल्याची बडबड केली. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचल्याने सुरत पोलिसांनी त्याच्या वक्तव्याची खात्री करण्यासाठी, अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याशी संपर्क साधला. संशयिताने सांगितलेला घटनाक्रम खुनाशी जुळत असल्याने एपीआय राकेशसिंग परदेशी यांनी सहकाऱ्यांसोबत सुरत येथून संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणातील अन्य दोन संशयित पसार आहेत. पोलिसांनी संशयित वाल्मिक चौधरीला अटक करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्या.एस.बी.अग्रवाल यांनी अटकेची परवानगी दिली.
हे देखील वाचा :
- जळगावात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांचा छापा; ३४ गॅस सिलेंडर जप्त
- गोदावरी नर्सिंगच्या एएनएम द्वितीय वर्षाचा उत्कृष्ट निकाल
- सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट
- जळगाव जिल्ह्यात अजय-अतुलचा लाईव्ह कार्यक्रम; कुठे आणि कधी होणार?
- कांद्याच्या भावात मोठी घसरण; आता प्रतिक्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव?