⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

प्राणघातक हल्ल्यातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य गेट समोर दि.२२ मार्च ऐवजी २ जणांवर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या तरुणाचा गुरुवारी मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. सुरेश विजय ओतारी (वय-२८) असे मयताचे नाव आहे. प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे.

तुकारामवाडीत दि.१८ मार्च रोजी धुलिवंदनहून दोन जणांचे वाद झाले होते. त्याचे पर्यावसन संध्याकाळी ५ वाजता प्राणघातक हल्ल्यात झाले होते. सुरेश विजय ओतारी (वय २८) आणि अरुण भीमराव गोसावी (वय ४७) दोन्ही रा.तुकाराम वाडी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचाराकामी आले होते. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर गेल्यावर गेटच्या समोरच त्यांच्यावर भूषण माळी व अन्य पाच ते सहा जणांनी धारदार कोयता, लाकडी बल्ल्या व अन्य धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली.

स्वतःला सोडवून अरुण गोसावी यांनी रुग्णालयात धावत जात पळ काढला तर सुरेश ओतारी मात्र हल्लेखोरांच्या तावडीत सापडला होता. त्याच्यावर उजव्या कानाच्या मागे, डाव्या कानाच्या मागे, डाव्या खांद्यावर, डाव्या पोटाजवळ आणि पार्श्वभागावर धारदार शस्त्राचे वार झाले होते.

जखमी अवस्थेतच सुरेश ओतारी हा रुग्णालयात गेला. त्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याला आधार देत अत्यावश्यक शस्त्रक्रियागृहात नेले. तेथे वैद्यकीय पथकाने त्याच्यावर उपचार सुरू केले होते. रक्तपेढीत लपून बसल्याने अरुण गोसावी यांचा जीव वाचला होता. सुरेश ओतारी गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर सुरुवातीला जळगावात खाजगी रुग्णालयात तर गेल्या तीन दिवसांपासून नायर हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू होते.

बुधवारी उपचार सुरू असताना सायंकाळी सुरेश ओतारी याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप काही संशयितांना अटक करणे बाकी असल्याचे समजते.