⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पती म्हणाला ‘भिशीचे पैसे भरण्यासाठी पोस्टाचे पैसे दे’ आणि पत्नीने केली त्याची हत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । पैशांच्या कारणावरुन झालेल्या वादातून पत्नीने फेट्याच्या कापडाने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक येथे घडली आहे.. या प्रकारानंतर पत्नीने पतीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत खरे सत्य समोर आलेच. वनिता सिताराम गायकर (मुसळगाव, ता. सिन्नर) या महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिताराम लक्ष्मण गायकर (वय ४२) मु. आहुर्ली पो. साजेगाव ता. इगतपुरी येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुसळगाव हायस्कूल येथे राहत होते. त्यांची पत्नी वनिता हिच्यासोबत त्यांचे काही ना काही कारणावरुन वाद होत असे. दोन दिवसांपूर्वी सिताराम आणि वनिता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भिशीचे पैसे भरण्यासाठी पोस्टाचे पैसे द्यावे, अशी मागणी सितारामने केली. याचा राग वनिताला आला. त्यामुळे तिने संतापाच्या भरात फेट्याच्या कापडाने पती सिताराम याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ती पोलिस स्टेशनमध्ये आली आणि तिने पोलिसांना सांगितले की, पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांना संशय आला.

त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. अखेर वनिताने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली आहे. त्यानुसार, पत्नी वनिता विरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर के त्रिभुवन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ बलक हे पुढील तपास करीत आहेत.