बसमधून महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लांबविले
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगमधून तब्बल २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने महिलेने चोरल्याची घटना नुकतीच उघडकीला आली असून या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, औरंगाबाद येथील रहिवासी शोभा शिवाजी पाटील (वय-५३) या दि १६ एप्रिल रोजी कामानिमित्त भडगाव ते चाळीसगाव दरम्यान बसमध्ये प्रवास करीत होत्या. नगरदेवळा दरम्यान एका अनोळखी महिलेने त्यांच्या बॅगेतून २ लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार चाळीसगाव बसस्थानकात उतरल्यानंतर शोभा पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात जात सदर घटनेची हकीकत सांगितली. शोभा पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहेत.