मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री घेतील तोच निर्णय योग्य असेल ! : आमदार चिमणराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज | चिन्मय जगताप | मंत्रिमंडळ विस्तार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणता निर्णय घेतील तो योग्य आणि मान्य असेल अशी प्रतिक्रिया आमदार चिमण आबा पाटील यांनी जळगाव लाईव्ह शी बोलताना दिली.

गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिना नंतर हा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं जात आहे. विरोधकांकडूनही मंत्री मंडळाचा होत नसलेला विस्तार ही एक टीकेची बाब बनली आहे.

अशातच नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना व भारतीय जनता पक्ष सर्व निवडणुका एकत्रित लढेल आणि मंत्री पदाचा विस्तारा बाबतच्या चर्चा झाल्या असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन झाला की लगेच हा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा प्रकारच्या बातम्या सध्या यायला सुरुवात झाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ शिवसेना आमदार चिमण आबा पाटील यांना देखील मंत्रिपद मिळेल अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमातून पोहोचवल्या जात आहेत. याविषयी खुद्द चिमण आबा पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी “जळगाव लाईव्ह” ला सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणता निर्णय घेतील तो योग्य आणि मान्य असेल.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला जे १६ आमदार सुरत येथे गेले. यामध्ये चिमण आबा पाटील यांचा समावेश होता. चिमण आबा पाटील हे नेहमीच एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक राहिले आहेत. अशावेळी त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातच स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मंत्री पद मिळाले. मात्र मंत्रीपद विस्तारावेळी ही संधी चिमणाबा पाटील यांना मिळेल अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री पद मिळतील का? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे