जळगाव लाईव्ह न्यूज | २० मे २०२३ | जळगाव जिल्हा पोलिसांनी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली असून मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांच्या कारवाईत ४ गावठी कट्टे, ५ तलवारी, दोन चोपर, १ चाकू आणि जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गेल्या जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सूचना केल्या होत्या. महिनाभरात जिल्हा पोलिसांकडून कारवायांना गती देण्यात आली असून गुन्हेगारांवर एमपीडीए, मोकका, तडीपारच्या कारवाया सुरू आहेत. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी जळगाव जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गावठी कट्टे, तलवारी, चोपर, चाकू असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, परिरक्षावधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, आप्पासो पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा आदी उपस्थित होते.
अजिंठा चौफुलीच्या पुढे गुरुवारी रात्री एस. टी वर्कशॉप जवळ अंधारात काही ईसम हे मोटार सायकली घेऊन उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोना हेमंत कळसकर, चंद्रकात पाटील, प्रदीप पाटील, दिपक चौधरी, अशपाक शेख अशांनी मध्यरात्री ३ वाजता रस्ता लुट व दरोडयाच्या प्रयत्नात असलेले स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर, (वय-१९ वर्षे), निशांत प्रताप चौधरी (वय १९ वर्षे, दोन्ही रा. शंकरराव नगर), पंकज चतुर राठोड (वय- १९ वर्षे, रा. तुकारामवाडी जळगाव), यश देवीदास शंकपाळ (वय १९ वर्षे, रा. हरिओम नगर, आसोदा रोड) दोन अल्पवयीन यांना ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ गावठी बनावटचे पिस्टल, चाकु, मिरचीची पुड, दोर, ३ जिवंत काडतुस, दोन मोटार सायकली असे दरोड्याकामी लागणारे साहीत्य मिळुन आले होते. सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून स्वप्नील उर्फ गोल्या धर्मराज ठाकुर याच्यावर ५ गुन्हे, निशांत प्रताप चौधरी याच्यावर ५ गुन्हे, यश देवीदास शंकपाळ याच्यावर १ गुन्हा दाखल आहे. याबाबत एमआयडीसी पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोना योगेश बारी हे करीत आहेत.
भुसावळ शहरात वाल्मीक नगर परिसरातून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने ललित तुलसीदास खरारे, जितेन आनंद बोयत यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूस, दोन मोबाईल, एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कारवाई पथकातील हवालदार सूरज पाटील, रमण सुरळकर, यासीन पिंजारी, संकेत झांबरे यांनी केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात मयुर नारायण मोरे याने घरात विना परवाना गावठी पिस्तूल आणि तलवारी बाळगल्या असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती. पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार कमलाकर बागुल, अनिल देशमुख, जयंत चौधरी, महेश महाजन, दीपक पाटील, श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर पाटील यांनी कारवाई केली असता मयुर मोरे व कल्पेश राजू मोरे यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, ५ तलवारी, १ काडतूस मिळून आले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद येथे शुक्रवारी एक तरुण गावठी कट्टा तस्करी करणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रविंद्र पाटील, दीपक शिंदे यांना मिळाली होती. पथकाने लागलीच धाव घेत बस क्रमांक एमएच.२०.बीएल.२२७७ मध्ये बसलेल्या रमेश घुमरसिंग भिलाला याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस मिळून आला. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.