⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

फोन प्रकरणाची भयानक व्याप्ती : मंत्री भुजबळ, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, फोनचा गैरवापर

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या सुनील झंवर यांचा मुलगा सुरज झंवर याला काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ व जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावे फोन आले होते. वरवर दिसणाऱ्या या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड गंभीर असून चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावे असलेल्या फोनचा देखील यात वापर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांना देखील या प्रकरणात चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण केल्याचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यातील बीएचआर अपहार प्रकरण गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात गाजत आहे. पोलिसांकडून अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. बीएचआर अपहार प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर यांचा मुलगा सुरज झंवर यांना नुकतेच ना.छगन भुजबळ यांच्यासह जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावे फोन आले होते. समोरील व्यक्तीचा उद्देश स्पष्ट नसला तरी त्याने अनेक दिग्गजांच्या नावांचा उपयोग केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरज झंवर यांनी या चार दिवसांच्या फोन नाट्य प्रकरणी अंबड पोलिसात तक्रार नोंदविली असली तरी जिल्हा प्रशासनाने किंवा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत प्रकरणाचा छडा लावण्याची गरज आहे.

सुरज झंवर यांना चार दिवसात वारंवार विविध क्रमांकावरून फोन आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने एकदा समीर भुजबळ यांच्या नावे संपर्क केला. एकदा तर चक्क मंत्री भुजबळांच्या नावेच समोरील व्यक्तीने संपर्क साधला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावे असलेल्या लँडलाईन क्रमांक ०२५७-२२२०४०० आणि आणखी एका क्रमांकावरून झंवर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. इतकंच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लँडलाईन क्रमांकावरून जिल्हाधिकारी बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीने देखील झंवर यांच्याशी संपर्क केला होता. याचाच अर्थ कि समोरील व्यक्तीने जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क करून त्यांना देखील चुकीची माहिती दिल्याचा अंदाज आहे.

राज्याचे मंत्री ना. छगन भुजबळ व जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावे फोन करून माजी मंत्री ना.गिरीश महाजन यांना याबाबत माहिती न देण्याचा सल्ला देखील समोरील व्यक्तीने दिला होता. सुरज झंवर यांच्याशी याबाबत चर्चा केली असता, आमचा पोलीस आणि न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून आम्ही अगोदरच तणावात असताना कुणीतरी असे फोन करून आमचा त्रास वाढवीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच याबाबत पोलिसात तक्रार दिली असून योग्य तो शोध घेण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.