जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. राज्य सरकारने सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून अतिवृष्टीमुळे जळगावसह काही भागांमध्ये कर्जवसुलीला स्थगिती दिली असल्याची माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मंत्री पाटील यांनी सांगितले की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुलीस गती मिळत असून 31 मार्च 2026 पर्यंत सुमारे 500 कोटी रुपयांची वसुली होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून जळगाव बँकेसाठी 800 कोटी रुपयांचे अतिरिक्त अल्पमुदत कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी एकूण 1403.86 कोटी रुपयांचे कर्जवाटप ठरवले असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केले गेले आहे. पुढील खरीप हंगामासाठीही 1200 ते 1300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे आणि निर्धारित मुदत संपल्यानंतर पुनर्गठन करणे शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी. ही योजना अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक दिलासा देणारी पाऊल ठरत आहे.







