⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जळगावमध्ये नऊवर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न; चिमुकल्यांना ‘गूड टच, बॅड टच’ शिकवा

जळगाव लाईव्ह न्यूज | 3 जानेवारी 2023 | पतंग उडविण्यासाठी मांजाची चक्री देण्याच्या बहाण्याने जळगावमधील एका नऊवर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित बालकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्याम गोपाल वर्मा (वय ४५, रा. जळगाव) या ४५ वर्षीय संशयितांविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर लहान मुलांची सुरक्षितता व लैंगिक शिक्षणाचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शाळा, स्कूल बस, घरांत, रस्त्यावर अशा अनेक ठिकाणी लहान मुलांचे लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार होण्याचे प्रकार वाढत आहेत. मुलांचे लैंगिक शोषण, अत्याचार हे निश्चितच साधे गुन्हे नाहीत. दिवसेंदिवस त्याचे गांभीर्य वाढतेच आहे. समाजाला हे प्रश्न आतून पोखरत आहेत. आज मुले घरात सुरक्षित नाहीत. रस्त्यावरही नाहीत. सकाळी घरातून बाहेर पडलेली मुलगी रात्री घरी पोहोचेपर्यंत पालकांना चिंता असते. भीतीची सतत टांगती तलवार मुलांवर आणि पालकांवरही असते. स्त्रियांवर होणारे अत्याचार हा जसा कोणत्याही स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न नाही तर तो एक सामाजिक प्रश्न आहे, त्याचप्रमाणे अल्पवयीन मुला-मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार हादेखील फक्त त्या घराचा प्रश्न नसतो तर तोही संपूर्ण समाजाचाच एक प्रश्न असतो. कारण चिमुकल्यांना सुरक्षित जीवन देणे ही आपली जबाबदारी आहे.

लहान मुलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, ओळखीच्या लोकांकडूनच हा अत्याचार होतो. घरात-रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडून, जवळच्या माणसांकडून होणार्‍या लैंगिक शोषणाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षक, लहान मुलांना सांभाळण्याचे काम करणार्‍या व्यक्ती, शाळेत ने-आण करणारे चालक अशा व्यक्तींकडून होणार्‍या अत्याचाराच्या बातम्या आपल्या प्रत्येकाच्या वाचण्यात आल्या आहेतच. या घटना रोखण्यासाठी कायद्याची जरब महत्त्वाची आहे. पोक्सोसारखे अनेक उत्तम कायदे आहेत. मात्र, त्यांची चोख अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

मुलांना ‘गूड टच, बॅड टच’ शिकवा
बाल-लैंगिक अत्याचाराचा समाजातला प्रश्न संपावा असे सगळ्यांनाच वाटते; पण बोलण्याची सुरुवातच कुणी करत नाहीत.पालक आणि मुलांध्ये सामान्यपणे या विषयावर संवाद होऊच शकत नाही. लैंगिक अवयव व लैंगिकता हे विषय बोलायला खूप अवघड, लाजिरवाणे, ओंगळवाणे आहेत अशी सर्वांचीच भावना असते. मुलांसाठी उपलब्ध असलेला माहितीचा स्रोत म्हणजे काही वेळा स्वतः अत्याचारी व्यक्तीच असतात. त्यामुळे अनेकदा अशा प्रकारचे लैंगिक संबंध होत राहतात व त्याला शोषण म्हणतात हे मुलांना कळतच नाही. यामुळे तज्ञांच्या मते, ‘गूड टच, बॅड टच’ मुलांना शिकवायला हवे. या प्रश्नाबाबत आवश्यक असणारा स्वीकार, सजगता व अत्याचार थांबवण्याची जबाबदारी वैयक्तिक मानण्याची मानसिकता समाजातील सर्व घटकांध्ये निर्माण झाली पाहिजे. तेंव्हाच अशा घटनांना आळा बसू शकतो.