जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२३ । होळी व धूलिवंदन हा वसंत ऋतूचा स्वागतोत्सव आहे. होळी पेटवताना व रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी आणि सणाचा आनंद द्विगुणित करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
होळी पेटवताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळीसाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्या.
त्याचप्रमाणे धुळवडीस रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यांपर्यंत उडणार नाहीत याची काळजी घ्या. शक्यतो रंग भरलेले फुगे फेकू नका. रंग उडवताना ते विजेचे खांब आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाहीत याची खबरदारी घ्या. वीज वितरण यंत्रणेची रोहित्रे व तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब अंतरावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे विजेच्या खांबांना स्पर्श करू नका. विजेच्या खांबांभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची खबरदारी घ्या. घरात रंग खेळताना वीज मीटर, प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा. ओल्या हाताने विजेच्या बटनांना स्पर्श करू नका. होळीचा सण हा आनंदाचा उत्सव असल्याने खबरदारी घेऊन होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
हे लक्षात ठेवा :-
• वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा.
• होळी आणताना तिचा स्पर्श वीज वाहिन्यांना होऊ नये.
• वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका.
• ओल्या शरीराने वीज उपकरणांना स्पर्श करू नका.
• वीज खांबांभोवती पाण्याचा निचरा करू नका.