वेळेत देयके न देणाऱ्या रिडींग एजन्सीवर कारवाई करा: प्रा.धिरज पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ नोव्हेंबर २०२२ | वीज महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास भुसावळ तालुक्यासह शहरातील वीज ग्राहकांना होत आहे. बहुतांश वीज ग्राहकांना ऑक्टोबर २०२२ ची वीज देयक मिळाली नाहीत तर काही ग्राहकांना नेहमी अंतिम देयक दिनांकानंतर येत आहेत. परिणामी, वेळेत बिल घरी न आल्याने ग्राहकांना वारंवार नाहक अतिरिक्त दंड भरावा लागत आहे. वीज वितरण कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीची दखलही घेतली जात नाही. यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत. आता लगेचच नोव्हेंबर – २०२२ ची देयके येतील. दोन महिन्यांची देयके एकदाच अदा करतांना नागरिकांची दमछाक होणार आहे. भुसावळ शहरात वेळेत मीटर रिडींग न घेणाऱ्या तसेच विज देयके वाटप न करणाऱ्या संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी प्रा. धिरज पाटील यांनी मुख्य अभियंत्याकडे केली आहे.

विज ग्राहकांना भुर्दंड
वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या वीज देयकावर देयक दिनांक टाकण्यात येतो. हा देयक दिनांक म्हणजे ज्या वेळी वीज बिल सिस्टीममध्ये तयार होते ती तारीख असते. साधारण या तारखेच्या दहा दिवसांमध्ये ग्राहकांच्या घरी वीज बिल येणे अपेक्षित असते. अंतिम देयक दिनांकापासून बिल भरण्याची अंतिम तारीख घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळी असते; परंतु तोपर्यंतही अनेक ग्राहकांकडे वीज बिल पोहोचत नसल्याने ग्राहकांना दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम वीज देयकाच्या रकमेवरून ठरते. दहा रुपयांपासून पुढे कित्येक रुपये दंड आकारला जातो. परिणामी, वीज बिल वितरक ठेकेदाराने घरी वीज बिल उशिरा आणल्याने कोणतीही चूक नसताना वीजग्राहकांना दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

जेष्ठ नागरिकांना त्रास
अनेक ग्राहकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. तर काही जेष्ठ नागरिकांना वीज देयकासाठी महावितरणच्या दोन मजली कार्यालयात जावे लागते. वय जास्त असल्याने फेऱ्या मारतांना त्रास होतो अश्या अनेक तक्रारी जेष्ठ नागरिकांनी केल्या आहेत. महावितरण कंपनीने वीज देयक वितरित करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. काही ग्राहकांची अशी तक्रार आहे की मुद्दामहून त्यांना उशिरा बिल दिले जाते. असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत प्रचंड राग व असंतोष निर्माण झाला असून या सर्व बाबींवर योग्य कारवाई न केल्यास भुसावळ तालुक्यातील वीज ग्राहक महावितरणविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

महावितरण अधिकारी, ठेकेदार व ग्राहकांची एक संयुक्त बैठक लावावी, नागरिकांना होणाऱ्या अडचणी यात मांडल्या जातील. सोबत खरंच ठेकेदार योग्य काम करीत आहे की नाही हेही समोर येईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना याबाबतीत सूचना करावी


…प्रा.धिरज पाटील