बातम्यामहाराष्ट्र

जळगाव–जालना रेल्वे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार; केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या जळगाव–जालना रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या नवीन रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ५ हजार ८०४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली झाल्यामुळे पुढील वर्षभरात १७४ किलोमीटरच्या या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Jalna Jalgaon Railway

सुमारे १७४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गातील जवळपास १४० किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातून तर उर्वरित ३४ किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यात थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. सध्या या दोन भागांदरम्यान रेल्वेने प्रवास करताना मोठा वळसा घ्यावा लागतो. मात्र नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या तालुक्यांतून जाणार रेल्वेमार्ग

हा रेल्वेमार्ग जालना, भोकरदन आणि बदनापूर तालुक्यांतून जाणार आहे. जालना–बदनापूर तालुक्यांतील ९ गावांमधील १४६ हेक्टर, तर भोकरदन तालुक्यातील १६ गावांमधील १८० ते २०० हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालीय. दरम्यान जळगाव तालुक्यातील तरसोद, पिंपळे, कुसुंबा, आसोदा, देव्हारी, धानवड, मन्यारखेडा तसेच जळगाव बुद्रुक परिसरातील एकूण सुमारे ८६.६९ हेक्टर शेतजमिनींचे क्षेत्र संपादित केले जाणार आहे.

जालना, बदनापूर, भोकरदन आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघांतून हा मार्ग जातो. जालना उपविभागातील नागेवाडी, तुपेवाडी, देऊळगाव, मानदेऊळगाव, नजीक पांगरी, मांडवा, खादगाव, दावलवाडी तसेच भोकरदन तालुक्यातील गारखेडा, बेलोरा, क्षीरसागर, नांजा, सोयगाव देवी, तपोवन, वालसा खालसा, चांदई ठोंबरी, देऊळगाव ताड, बोरगाव तारू, मुठाड, राजूर, चांदई टेपली, चिंचोली, जोमाळ या गावांतून हा मार्ग जाईल. हा रेल्वे मार्ग जालना-राजूर-सिल्लोड-अजिंठा-जळगाव असा हा असणार आहे. अजिंठा लेणी, तीर्थक्षेत्र राजूरेश्वर गणपती मंदिरासह मराठवाड्याला थेट मुंबई-दिल्ली-कोलकाता या महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button