⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

शिंदे गटाला दणका, खंडपीठात निकाल वाचन सुरू!

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । दसरा मेळाव्यात नेमका कुणाला अनुमती द्यावी या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टात मुंबई महापालिका, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट या तीनही पक्षकारांकडून युक्तीवाद केला गेला. तीनही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने निकाल वाचनाला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा मध्यस्थी याचिकेचा अर्ज फेटाळून लावला. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केले. तसेच २०१७ मध्ये पालिकेने कशी परवानगी दिली हे पाहावे लागेल, असे न्यायाधीश म्हणाले.

शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट इच्छुक आहेत. मेळाव्याचा वाद आता कोर्टात जाऊन पोहचला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आज मुंबई हायकोर्टात पोहोचला. दोन्ही गटाला मुंबईच्या शिवतीर्थ येथे दसरा मेळावा घ्यायचा आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून मुंबई महापालिकेकडे परवानगी मिळावी, असा अर्ज करण्यात आला होता. पण सुरक्षेचा विचार करुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली होती.

मुंबई खंडपीठात शिंदे गट, ठाकरे गट आणि मुंबई महापालिकेकडून युक्तीवाद करण्यात आला. तीनही बाजूचा युक्तीवाद संपल्यानंतर कोर्टाकडून लगेच निकाल वाचण्यात आला. दरम्यान, शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी मध्यस्थी याचिकेसाठी दाखल केलेला अर्ज खंडपीठाने फेटाळून लावला.