राजकारणमहाराष्ट्र

अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’ ; पैशांच्या गड्ड्यांसह ‘त्या’ आमदाराचा व्हिडीओ केला शेअर, राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ambadas danve video

अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ३ व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, ‘या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?’ अंबादास दानवे यांनी हे व्हिडीओ पोस्ट करत सरकारलाच अनेक सवाल केले आहेत.

अंबादास दानवे यांनी हे व्हिडीओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला टॅग केले आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये केलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावीत अशी मागणी केली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवशेनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजू शकतो. या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. सरकार यावर नेमकं काय उत्तर देतेय हे पाहणे महत्वाचे राहिल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button