बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

आंतरराष्ट्रीय योग दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२३ । नववा आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा योग दिन जळगाव जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रविद्र भारदे यांनी केली.

नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून, 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. योग दिन साजरा करण्यासाठी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, क्रीडा समन्वयक, एन.सी.सी., एन.एस.एस. चे प्रतिनिधी, विद्यापीठ प्रतिनिधी, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी, पतंजली, योगा असोसिएशन यांचे समवेत बैठकीचे आयोजन करून जिल्ह्यात जास्तीत जास्त संख्येने योगा दिवस साजरा करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

येत्या 21 जून रोजी योग दिनानिमित्त शहरात योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शहरात बाईक रॅली, मुख्य चौकात योग प्रात्याक्षिके सादर करणे, जिल्ह्यातील उच्च पदस्थ अधिकारी यांचे योगाबाबत आवाहन प्रसारीत करणेबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरीक यांनी मोठया प्रमाणात सहभागी होऊन आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिक्षित यांनी केले.