⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

.. मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा टेंडर काढा ; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२२ । शिवसेनेचा (Shivsena) आज ५६ वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्यांनी अग्नीपथ योजनेवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे, भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा टेंडर काढा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून हल्लाबोल केला.

गेल्या काही दिवसापूर्वी मोदी सरकारने अग्निपथ योजना सुरु केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. मात्र या योजनेवरून देशभरात कडाडून विरोध केला जात असून आंदोलने केली जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला.

देशातील तरुणांवर ही वेळ का आली? मत म्हणजे आयुष्य असतं, शिक्का नव्हे, अग्निपथ योजना मृगजळ असल्याचे ते म्हणाले. हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे. हृदयात राम आहेच, पण प्रत्येकाला दाखवता येणार नाही. हाताला काम नसेल तर राम राम करून काहीच फायदा होणार नाही. भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारण्यांसाठी सुद्धा टेंडर काढा, हातात काम नसेल, तर राम राम करण्यात अर्थ नाही, अशी वचन द्यावीत जी पाळता येतील, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

सुरुवातीला नोटाबंदी झाली. लोकांमध्ये भीती असल्याने निर्णय पचून गेला. शेतकरी कायदे आले, पण नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावे लागले. वचने अशी द्या जी पूर्ण झाली पाहिजेत. शिवसेनेने जे जे वचन दिलं ते पूर्ण केलं आहे. दोन कोटी नोकऱ्या देऊ म्हणाले, पण काहीच दिलं नाही. एखादी योजना आणायची अग्निवीर, अग्निपथ योजना. शिकवणार सुतार काम. गाडी चालवायला शिकवणार. रंधा मारायला शिकवणार आणि नाव अग्निवीर, अशी बोचरी टीका त्यांनी केली.