जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील उपसरपंच कार्यरत असताना, सरपंच व ग्रामसेवक यांनी कायदेशीर बाबींचा अवलंब न करता बेकायदेशीरपणे घेण्यात येणाऱ्या उपसरपंच पदाच्या निवड प्रक्रियेस जिल्हाधिकारी यांनी काल गुरुवारी रोजी स्थगिती दिली आहे.
सुकळी ग्रुप ग्राम पंचायत दि.1 जून 2022 रोजी नंदकुमार नमायते यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला असता, नविन उपसरपंच पदासाठी दि.13 जून 2022 रोजी सरपंच याचे अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये अनिल ज्ञानेश्वर कोळी हे निवडून आले. सर्वानुमते ठराव पारित करून विजयी घोषित करण्यात आले, व त्यांना पदभार देण्यात आला. ते पदावर कार्यरत असतानाच दि. ८ सप्टेंबर रोजी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया घेण्यात येणार होती. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडुन तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
उपसरपंच अनिल कोळी यांनी याप्रकरणी आक्षेप घेत गटविकास अधिकारी मुक्ताईनगर तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अनिल कोळी यांना उपसरपंच पद लाभलेले असून सद्य:स्थितीत ते उपसरपंच पदावर कार्यरत आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांना काही एक न कळवता, विचारता न घेता किंवा त्यांचा राजीनामा न घेता तसेच काही एक कारण नसताना, जाणीवपुर्वक व हेतुपुरस्करपणे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी उपसरपंच निवडीबाबत कार्यक्रम जाहीर केला. दि.८ रोजी निवड प्रक्रिया कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान याप्रकरणी उपलिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या तरतुदी अन्वये ग्राम पंचायत सुकळी येथील उपसरपंच निवड बाबत उचित कारवाई करुन अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपूरम यांनी कायदेशीर बाबी तपासुन सुकळी येथील आधी झालेली उपसरपंच निवड वैध असून नव्याने उपसरपंच निवडीचा कार्यक्रम आपल्या स्तरावरुन तुर्त स्थगित करण्यात यावा, असा निर्णय दिला आहे. यामुळे कार्यरत उपसरपंच अनिल ज्ञानेश्वर कोळी हे पदावर राहणार आहेत.