जळगाव लाईव्ह न्यूज । प्रेमविवाह केल्याच्या कारणातून मुलीच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केली. संदीप भीमराव निकम (वय २८) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील पाचजणांरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील संदीप निकम हा नाशिक महापालिकेमार्फत चालवणाऱ्या सिटी लिंक बसमध्ये कंडक्टर म्हणून कामाला होता. तेथे त्याचे एका मुलीशी प्रेमाचे सूर जुळले व त्यांनी नाशिकमध्ये विवाह केला.
त्यानंतर संदीप हा पत्नीसह हातगाव येथे काही दिवसांपूर्वी मुलीचे आई, वडील, भाऊ व काका असे ४ ते ५ जण हातगाव येथे आले व दोघांचे लग्न थाटामाटात लावून देण्याचे सांगत मुलीला सोबत पाठविण्यास सांगितले. मात्र, आई वडिलांसोबत जाण्यास मुलीने नकार दिला असता त्यांनी तू जर आमच्यासोबत आली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला आम्ही सोडणार नाही, अशी धमकी दिली.
मुलीने याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रारही दिली. १० फेब्रुवारी रोजी पुन्हा मुलीचे कुटुंब हातगावी आले व मुलीची समजूत काढून तिला घेऊन गेले. त्यानंतर मुलगी परत आलीच नाही. त्यामुळे संदीप हा पत्नीला घेण्यासाठी नाशिक येथे गेला असता तिच्या आई-वडिलांनी तिला भेटू न देता त्याला हाकलून देत शिवीगाळ करत मानसिक त्रास दिला. या त्रासामुळे खचलेल्या संदीप याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मिथुन भीमराव निकम याने दिलेल्या फिर्यादीवरून पाळदे मळा, बेलदगव्हाण, देवळाली कॅम्प येथील मुलीचे आई-वडील, भाऊ व मुलगी अशा पाचजणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम १०८, ३५२, ३५१ (२) प्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.