⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रमाची यशस्विता विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत २० टक्के वाढ

‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रमाची यशस्विता विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत २० टक्के वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपूण‌ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात १० ते २० ऑक्टोंबर या कालावधीत इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुलां-मुलींसाठी ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील १ हजार ७११ शाळांमधील १ लाख ७४ हजार ४४१ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यात कमालीचा यशस्वी झाला असून विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत २० टक्के वाढ झाली आहे. पूर्वीपेक्षा ३५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात प्राविण्य मिळवले आहे.

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या शिक्षण विभागाला सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आराखडा तयार करुन जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना अंमलबजावणीचे आदेश दिले. विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भिती दूर करणे, गणिताचे कौशल्यात सुधार करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला. यामुळे गणित विषयाच्या नियमित पाठ्यक्रमाचे लवकर आकलन करण्यात विद्यार्थ्यांना मदत झाली. या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी काम पाहिले.

‘दहा दिवस गणितासाठी’ या उपक्रमात गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, बेरीज , वजाबाकी, गुणाकार व भागाकार या सहा क्षमतेवर तालुकानिहाय गुणांकन करण्यात आले‌. सर्व तालुक्यांचे एकत्रित आकडेवारीच्या सरासरीतून जिल्ह्याचा एकूण गुणांकन करण्यात आले.’दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गणितीय पायाभूत आकलन क्षमता ५२ टक्के होती‌. उपक्रमांची २० ऑक्टोंबर रोजी सांगता झाल्यानंतर पायाभूत आकलन क्षमता ७२ टक्के झाली. या आकलन क्षमतेत २० टक्के वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांना सराव तसेच इतर कृती पध्दतीचा वापर करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याचा वापर करून गणित रंजक पद्धतीने शिकविण्यात आले. या उपक्रमांतर्गत शिक्षकांना त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन पूरक अधिकच्या कृतींचे आयोजन करता येण्याची मुभा देण्यात आली होती. याचा जिल्ह्यातील काही उपक्रमशील शिक्षकांनी चांगला वापर करत विद्यार्थ्यांना गणित हसत-खेळत शिकविले. या उपक्रमात आनंददायी कृतींचा, गणितीय खेळांचा, परिसरात व शाळेत उपलब्ध साहित्याचा यथायोग्य वापर करून गणितीय संकल्पनांचे विद्यार्थ्यांना आकलन होईल. अशा कृतीद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण झाली. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत वाढ झाली.

या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे दररोज सायंकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेत होते. शिक्षण विभागाच्या व डायट मधील सर्व अधिकाऱ्यांनी दैनंदिन किमान २ शाळांना भेटी दिल्या. शिक्षकांनी परिश्रमपूर्वक विद्यार्थ्यांना शिकविले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी ही तितकेच मन लावून गणिताचे आकलन केले.

या उपक्रमाच्या यशाबद्दल जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.