मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

समानसंधी केंद्रांतून सारथीच्या योजनांची विद्यार्थ्यांना माहिती मिळणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२३ । सारथी संस्थेमार्फत राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी – मराठा व मराठा – कुणबी यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती महाविद्यालयांमधील समानसंधी केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशी माहिती सारथीच्या नाशिक विभागीय उपव्यवस्थापकीय संचालक सीमा अहिरे यांनी आज येथे दिली.

पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या अधिनस्त नाशिक विभागीय कार्यालयाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सारथी संस्थेच्या विविध योजना व उपक्रमाबाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जळगाव समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती अहिरे बोलत होत्या.

श्रीमती अहिरे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी समानसंधी केंद्राची स्थापना जळगाव जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सारथीच्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या व शैक्षणिक योजनांची माहिती मिळणार आहे. अर्ज प्रकियेबाबत मार्गदर्शन ही करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत सारथीच्या विविध योजना व उपक्रमांबाबत सहायक लेखा अधिकारी मनिषा पाटील यांनी ही माहिती दिली . यावेळी सर्व जिल्हा समानसंधी केंद्र समन्वयक, तालुका समानसंधी केंद्र समन्वयक उपस्थित होते. कार्यशाळेला जळगाव जिल्हयातील सर्व समानसंधी केंद्र समन्वयकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.