⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

ठेकेदाराचे अजब उत्तर : दिवाळी आली म्हणून शहरातील कचरा वाढला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातला कचरा हा दिवाळी सण आला म्हणून वाढला आहे. पर्यायी इतरत्र आपल्याला कचरा पाहायला मिळत आहे. असे अजब उत्तर वॉटरग्रेसच्या प्रतिनिधीने आज आमदार राजुमामा भोळे यांना दिले.

महानगरपालिकेच्या पहिल्या माळ्यावर सभागृहामध्ये आमदार राजू मामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, उपायुक्त अभिजीत बाविस्कर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत पाटील, एमजी गिरगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीपासूनच सर्व प्रभाग समितीतील नगरसेवकांनी शहरातील कचरा निवारण होत नसल्याच्या तक्रारीचा पाढा आमदार भोळे व मनपा प्रशासना समोर वाचून दाखवला. सर्वांनी एकमताने या वॉटर ग्रेसच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशी मागणी देखील केली. मात्र, मनपा प्रशासनातर्फे आम्ही वेळोवेळी वॉटर ग्रेसवर दंडात्मक कारवाई करत आहोत असे उत्तर देण्यात आले.

आमदार राजू मामा भोळे यांनी याप्रकरणी बैठकीमध्ये वॉटर ग्रेसच्या प्रतिनिधीला याबाबतचा जाब विचारला. जाब विचारल्यावर उत्तर देताना वॉटर ग्रेसच्या प्रतिनिधीने हास्यास्पद उत्तर दिले. उत्तर देताना वॉटर ग्रेसच्या प्रतिनिधी म्हटले की, जळगाव शहरामध्ये दिवाळी सण आला आहे. यामुळे नागरिक घरातला सगळा कचरा बाहेर काढत आहेत. याच बरोबर मोठ्या प्रमाणावर साफसफाई देखील केली जात आहे. यामुळे जळगाव शहरातला कचरा वाढला आहे. असे उत्तर यावेळी वॉटर ग्रेसच्या प्रतिनिधीने दिले.