जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ सातपुड्याच्या कुशीत चक्रीवादळासह गुरुवारी रात्री झालेल्या पावसात, मोर धरण वस्ती आणि विटवा वस्ती या दोन्ही आदिवासी पाड्यावरील आदिवासी कुटुंबांचे नुकसान झाले. या पावसात दोन गुरेदखील दगावली.
हिंगोणा गावापासून सातपुड्याच्या दिशेने मोर मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पालगत आदिवासी वस्ती आहे. या वस्तीसह पुढे असलेल्या विटवा आदिवासी वस्ती परिसरात गुरूवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात दोन्ही वस्तीतील नागरीकांच्या झोपड्यांचे नुकसान झाले. चक्रीवादळात कुवरसिंग बारेला यांचे घर मातीचे घर कोसळले. यात एक गाय आणि वासरू दगावले. तर अनेकांचे कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. हिंगोणा सरपंच रूकसाना तडवी यांनी तलाठी धांडे यांना माहिती दिली. त्यांनी थेट आदिवासी वस्ती गाठून त्या ठिकाणी पंचनाम्यांना सुरूवात केली. ग्रामपंचायत सदस्य सारिका सावळे, कविता महाजन, छबू तडवी, सागर महाजन, शांताराम तायडे, किशोर सावळे, फिरोज तडवी, नवाज तडवी, संतोष सावळे यांनी पाहणी केली.