जळगाव लाईव्ह न्यूज | आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महाभारताचे रचयिता श्री महर्षी व्यास यांचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदु धर्मांत महर्षी व्यास आद्य गुरु मानले जातात. महर्षी वेद व्यास यांना श्रीमद भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा याशिवाय १८ पुराणांचे लेखक मानले जाते. यामुळेच महर्षी वेद व्यास यांना आदिगुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते. महर्षी व्यास यांचे संपूर्ण भारतात केवळ तीन मंदिरे आहेत. पहिले बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. यावल येथील व्यास मंदिराला तब्बल साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराबाबत काय अख्यायिका आहेत, हे आज आपण जाणून घेवूयात…..
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः॥
तिन्ही देवतांमध्येही गुरूचे स्थान सर्वोच्च आहे, असे संस्कृत श्लोकांतून सांगण्यात आले आहे. गुरु ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तो परम ब्रह्म आहे, त्या गुरूला नमस्कार असो. असा श्लोकाचा अर्थ होतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते. अध्यात्मिक क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेस अनन्य महत्व आहे. या परंपरेत महर्षी व्यास गुरूंच्या अग्रस्थानी आहेत. महर्षी व्यासांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत रहस्य मानले जाते.
महाभारताचे काही पर्व यावल येथे लिहिल्याची आख्यायिका
सातपुडा पर्वत रांगेतील तापी नदीच्या खोर्यात असलेले यावल शहर महाभारताचे रचयिता श्री महर्षी व्यास यांची भुमी म्हणून प्रसिध्द आहे. महर्षी व्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याची आख्यायिका सांगितली जाते. महाभारत काळात सातपुड्याचे घनदाट जंगल यावलपर्यंत होते, असे सांगितले जाते. सध्याच्या येथील हडकाई-खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरीता-सरीता नद्या होत. या नद्यांच्या संगमानंतर वाहत असलेली सुर नदी ही दक्षिण वाहिनी आहे. याच नदीच्या उंच टेकडीवर लोमेश नावाच्या ऋषींंचा आश्रम होता. एकदा लोमेशांनी महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ आयोजित केला होता.
त्याचवेळेस अज्ञानवासातून पांडव हस्तीनापुराकडे परतताना लोमेश ऋषींच्या आश्रमावर आले असता त्यांच्या हस्ते लोमेशांनी महर्षीना यज्ञासाठी निमंत्रित केले होते व महर्षी व्यासांच्या हस्ते यज्ञ पार पडला. यज्ञ समाप्तीनंतर महर्षींनी काही काळ येथील भूमीत वास्तव्य केल्याचे व महाभारताची काही पर्वे लिहिली असल्याचे म्हटले जाते. महर्षी व्यास हे सप्त चिरंजिवापैकी एक होत. चिरंजीवी व्यास आजही या भूमीत वावरत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना आहे. यावल येथील व्यास मंदिराला साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. वेदांमध्ये या मंदिराचा उल्लेख आपल्या पहायला मिळतो. सुमारे साडेपाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या यावल येथील श्री व्यास मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमेला शुभ मुहूर्त
यंदा २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. पण या शुभ दिवसाचा शुभ मुहूर्त २०जुलै रोजी संध्याकाळी ५.५९ पासून सुरू होईल आणि २१ जुलै रोजी दुपारी ३.४६ वाजता समाप्त होईल. वैदिक धर्मात सूर्योदयापासून तिथी मानली जाते आणि म्हणूनच २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा उपवास केला जातो.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व
गुरुपौर्णिमा हा मुख्यतः एखाद्याच्या जीवनातील गुरु किंवा शिक्षकांना धन्यवाद देण्याचा दिवस आहे. अंधार (अज्ञान) दूर करणारे आणि आपल्या शिष्यांना ज्ञानाकडे नेणारे म्हणून गुरु कडे बघितले जाते.