⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

अमळनेरला श्री गुरूनानक जयंती उत्साहात साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२२ । सिंधी व सिख समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री गुरूनानक देव यांचा जन्मोत्सव नुकताच अमळनेर येथील सिंधी कॉलनी व शहरातील सिंधी हौसिंग सोसायटी येथे भक्तीमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभातफेरीने उत्सवाची सुरूवात
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भाऊबीजेपासून जयंती महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. चोपडा रोड वरील सिंधी कॉलनीत दररोज वेगवेगळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सिंधी कॉलनीतील हासाराम दरबार आणि झुलेलाल मंदिर येथून दररोज सकाळी ४ वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत सहभागी झालेल्या भाविकांना दररोज चहा,कॉफी,दूध यांचे वाटप करण्यात येत होते. तरआदी अम्मा गृपच्या वतीने भाविकांना दररोज नाश्ता देण्यात येत होता.दररोज सकाळी हासाराम दरबार येथे सत्संगाचे आयोजन करण्यात येत होते.

जयंतीदिनी भरगच्च कार्यक्रम
गुरूनानक जयंतीच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या अखंड पाठाची समाप्ती जयंतीच्या दिवशी सकाळी करण्यात आली. श्री गुरू ग्रंथ साहेब या ग्रंथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सिंधी कॉलनीतील बिशनदास दरबार येथून कॉलनी परिसरात अतिशय धूमधडाक्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत तरूणांसह पुरूष व महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर नृत्य करून तरूणाईने जल्लोष केला. महाप्रसाद, दिपमहोत्सव,श्री जबजी साहेब यांचे एक लाख चौदा हजार पाठ,किर्तन सेवा,जन्मोत्सवाच्या वेळेस फटाक्यांची जोरदार आतिशबाजी असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

यांची होती उपस्थिती
श्री गुरूनानक देव यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमास भाई साहेब जितेंद्र तोलानी,भाई साहेब हरी तोलानी,नारायण तोलानी, स्वामी तोलानी, कृष्णा तोलानी, महाराज स्वामी गोपीचंद शर्मा, संजय शर्मा, किशन शर्मा,प्रदीप तोलानी, बंटी भाई साहेब, बलवंतसिंग लुल्ला,दिलीपसिंग लुल्ला,दिलीप जगमलानी यांच्यासह महिला व पुरुष भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातही उत्साहात कार्यक्रम
अमळनेर शहरातील सिंधी हौसिंग सोसायटी मधील भाई लुधडासिंग दरबार या ठिकाणीही श्री गुरूनानक जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सत्संग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सिंधी व सिख समाज बांधवांनी श्रध्दा व भक्तीभावाने सहभाग घेतला.