⁠ 

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा टांगा पलटी, घोडे फरार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील व आमदार लताताई सोनवणे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil Jalgaon) हे देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जावून मिळाले आहे. यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil Muktainagar) हे देखील गुवाहाटीच्या मार्गावर निघाले असल्याचे वृत्त टीव्ही ९ या वृत्त वाहिनीने दिले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची अवस्था असून नसल्यासारखी झाली आहे. (Special Article on ShivSena Jalgaon)

शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर याचा मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यात पहायला मिळत आहे. सुरुवातील शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील (MLA Kishor Patil Pachora) हे नॉट रिचेबल झाले होते. ते शिंदे यांच्या समवेत सुरतला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी गुलाबराव पाटील मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या बैठकीत सहभागी झाले होते. तर आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil Pachora) हे देखील मुंबईत असल्याचे सांगितले जात होते. तसेच चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे (MLA Lata Sonawane Chopada) या जात प्रमाणपत्राच्या कामानिमित्ताने होत असलेल्या सुनावनीसाठी नवी दिल्लीत होत्या. सायंकाळपर्यंत घडालेल्या घडामोडींनंतर चिमणराव पाटील व लताताई सोनवणे या देखील सुरतलाच असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदारांनी बंडाचा झेंडा उचलला तर पक्षाचे काय होईल? व आपण कोणचा झेंडा हाती घ्यावा, पक्षाचा का नेत्यांचा? असा प्रश्‍न अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला होता. अशावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचवेळी ते मुंबईत होणार्‍या शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीत सहभागी होत होते. दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसोबतच असल्याचा दावा वारंवार करत होते. मात्र बुधवारी जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का बसला. टीव्ही ९ या वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, गुलाबराव पाटील हे नॉट रिचेबल झाले असून ते गुवाहाटीला जात आहेत तसेच चंद्रकांत पाटील यांना मुंबईला येण्याचे आदेश मिळाल्यानंतर ते विमानतळावर येवून थेट गुवाहाटीला रवाना झाल्याचे वृत्त प्रसारित केले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.