जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२४ । सध्या यंदा कापसाला भाव नाही, सोबतच सोयाबीनही भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. विशेष शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने मोठा फटका बसत आहे. एका बाजूला उत्पादाचा खर्च वाढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सोयाबीनला कमी दर मिळत आहे
खरंतर सोयाबीनला हमीभाव आहे; पण, शासनाच्या निकषात बसत नसल्याने खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातशे रुपये प्रति क्विंटल नुकसान सहन करीत सोयाबीन विकावे लागत आहे. सरकारी हमीभावापेक्षा १८ टक्क्यांनी कमीच भाव सोयाबीनला मिळत आहे. ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव असताना खुल्या बाजारात ४१०० रुपयांच्या जवळपासच भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. केंद्र सरकारने २०२४-२५ च्या हंगामात सोयाबीनसाठी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.
परंतु, त्यात केवळ १० टक्के आर्द्रता अर्थात सुका सोयाबीन असावा अशी अट आहे. १२ ते १४ टक्के आर्द्रता असलेला सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात ४,१०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरानेच सोयाबीन विकावा लागत आहे. सोयाबीन खरेदीचे ह्या वर्षाचे उद्दिष्ट १५ लाख क्विंटलचे आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त ३० हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीन खरेदीचे एकही शासकीय केंद्र आजघडीला सुरू नाही. शेजारील बुलढाणा जिल्ह्यात फक्त खामगावला सोयाबीन खरेदी केंद्र सुरू असल्याची माहिती मिळाली.