⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोनी नगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्यासाठी उपमहापौरांचा हट्ट का?

जळगाव प्रतिनिधी  : येथील पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 च्या ओपन स्पेस (खुली जागा) जागेवर महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून  रुग्णालय बांधण्याचे ठराव   मंजूर करण्यात आला. परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता ठराव मंजूर केल्याने नागरिकांनी रुग्णालय बांधण्यावर  हरकत घेतली आहे.तसेच ऑनलाइन महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी विरोधात मत व्यक्त केलं असताना सत्ताधाऱ्यांनी त्यांची कोणतीही दखल न घेता ठराव मंजूर करून घेतला.

या परिसरात रुग्णालय बाधण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न  व पाठपुरावा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीच केल्याने त्याचा इतका हट्ट का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.

पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र 277/2 च्या ओपन स्पेस (खुली जागा) ही जागा स्थानिक राहिवाश्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम करणे, वयोवृद्ध यांच्यासाठी व बालकांना खेळण्यासाठी तसेच महिलांना विविध कार्यक्रम करण्यासाठी ही जागा सोडलेली असते.मात्र गेल्या महिन्याभरापासून उपमहापौर कुलभूषण पाटील हे रुग्णालय बांधणार तर सोनी नगरलाच असा हट्टीपणा करीत आहे.

वास्तविक पाहता पिंप्राळा परिसरातील वैकुंठधाम समोरील संत मीराबाई नगर परिसरातील डीपी प्लान नुसार आरक्षित जागा आहे.तसेच तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप रायसोनी  असताना सर्व नगरसेवकानी मिळून पिंप्राळा परिसरातील सोमाणी संकुलच्या वरील जागेवर दवाखाना बांधण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि तो मंजूर झाला होता.

पिंप्राळा हुडको परिसरातील 3 एकर जागा मनपाची जागा पडून आहे. तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या राहत्या परिसरातील मनपाच्या नावे असलेले खुली जागा (ओपन स्पेस) पडून आहे.  या जागेवर रुग्णालय न बांधता महापालिका प्रशासनाने व सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत ठराव करून  रुग्णालय बांधण्याचे ठराव   मंजूर करण्यात आला. हे सर्व उपमहापौर यांनीच घडवून आणले असल्याचा आरोपही नागरिकांनी केली.jalgaon (2)

याप्रकरणी परीसरातील नागरिकांची हरकत असून याबाबत नागरिकांच्या सह्याचे निवेदन आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, भाजपाचे नगरसेवकांना निवेदन दिले आहे.  तरीही या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही . त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

तरी महापालिका, जिल्हा प्रशासनाने दखल घेत रुग्णालय इतरत्र भागात बांधावे, सोनी नगरच्या मोकळ्या जागेत बांधू नये अशी मागणी  ज्ञानेश्वर ताडे, नरेश बागडे,  निलेश जोशी, जि.एस.शिंपी, सोपान पाटील, सोनू शर्मा, लाभेश पाटील, दिपक पाटील ,अजय पाटील यांनी केली आहे.