आम्ही निधी आणला म्हणून काही लोकांच्या पोटात दुखत आहे… !
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ । शंभर कोटीतून मंजूर कामांना ना हरकत दाखला (एनओसी) देण्यासाठी महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्याआधी शिंदे सेनेचे ॲड. दिलीप पोकळे यांनी आमच्या प्रभागातील कोणकोणती कामे शंभर कोटीत आहेत, हेच आम्हाला कळविले नाही तर, आम्ही एनओसी द्यायची कशी असा प्रश्न उपस्थित केला तसेच ठाकरे सेनेचे सचिन पाटील यांनी सहा मीटर रस्त्यात दीड मीटर भूमिगत गटारीसाठी सोडल्यास किती मीटरचा रस्ता होईल, अशी विचारणा केली. त्यावरुन, ‘आम्ही निधी आणला म्हणून काही लोकांच्या पोटात दुखत आहे, असा आरोप डॉ. अश्विन सोनवणे यांनी केला. दरम्यान, भाजप सेना नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक उडाली.
महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मनपाच्या सभागृहात महासभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसचिव सुनिल गोराणे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून दि.५ एप्रिल रोजी जळगाव मनपा क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांकरीता १०० कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. सदर कामे पीडब्ल्यूडी विभागाकडून करण्यात येणार असून पीडब्ल्यूडी विभागाकडून महानगरपालिकेकडे त्या कामांसाठी एनओसीची मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने मनपा प्रशासनाने एनओसी देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र, प्रस्तावातील रस्त्यांना एनओसी देण्यापुर्वी कोणकोणत्या रस्त्यांना एनओसी द्यावयाची आहे, याची सविस्तर माहिती आधी नगरसेवकांना देणे गरजेचे होते. तसेच पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनी सर्वे केला त्यावेळी नगरसेवकांना त्यांच्याप्रभागातील प्रस्तावित कामांची माहिती देणे गरजेचे होते परंतु पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनी नगरसेवकांना अंधारात ठेवून सर्वेक्षण केले. त्यानंतर पीडब्ल्यूडी रस्ते कशा पध्दतीने करणार आहे, ज्या ठिकाणी भूमिगत गटारी झालेल्या नाहीत, त्या ठिकाणचे काम कसे करणार हे देखील कळविण्यात आलेले नाही, तसेच शंभर कोटीच्या यादी मधील अनेक कामे इतर निधीतून आधी मंजुर झालेले असून त्यापैकी काही कामे सुरु आहे तर, काही कामे पुर्ण झाले आहेत, ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ॲड. दिलीप पोकळे व सचिन पाटील यांनी सांगितले. त्यावर ‘आम्ही निधी मंजुर करून आणल्यामुळे काही लोकांचे पोट दुखत आहे, आरोप करत येथे फक्त एनओसी द्यायची आहे, विकास कामांना कोणी विरोध करून नये,’ असे डॉ. अश्विन सोनवणे म्हणाले, त्यावर डॉ. सचिन पाटील व अश्विन सोनवणे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली होती.
*** महापौरांनी व्यक्त केला संताप
शंभर कोटींच्या कामांना ना हरकत दाखला देण्यावरून ठाकरे व शिंदे गट आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक सुरु झाल्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी दोन्ही गटातील नगरसेवकांना शांत बसा… खाली बसा अश्या सुचना दिल्या परंतु दोन्ही गटातील नगरसेवक ऐकत नसल्यामुळे महापौरांनी संताप व्यक्त केला. ‘ज्यांना विषय मांडायचा आहे त्यांनी परवानगी घेवून बोला, कोणीही उठून बोलतात सभागृहाची काही शिस्त आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला. तसेच ॲड.दिलीप पोकळे यांनी एनओसी देतांना पीडब्ल्यूडीच्या कामांवर मनपाचे सुपरव्हिजन राहिल अशी अट टाकावी, अशी मागणी केली. त्यावर पीडब्ल्यूडीविषयीच्या तक्रारी तुम्ही आमदार आणि मंत्री महोदयांकडे करा, त्यांनीच सदर निधी मनपाला डावलून पीडब्ल्यूडीला दिला असल्याचा टोला देखील महापौरांनी लगावला.
भाजप सदस्यांनी देखील व्यक्त केली नाराजी
भाजप नगरसेवकांनी देखील पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांविषयी नाराजी व्यक्त केली. आ. सुरेश भोळे यांनी रस्त्यांबाबत बैठक घेतली त्यावेळी पीडब्ल्यूडी व मनपा अभियंत्यांनी संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या होत्या परंतु पीडब्ल्यूडीने संयुक्त सर्वेक्षण केले नाही, यावरून भाजप गटनेते राजेंद्र घुगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, लोक प्रतिनिी व मनपा प्रशासनाला विश्वासात घेवून हे काम करण्यात यावे, अशी अट टाकून एनओसी द्यावी, अशी सूचना नितीन लढ्ढा यांनी मांडली.
असमान निधीवरून रंगला कलगितूरा
शंभर कोटींच्या निधीविषयी चर्चा करतांना नितीन लढ्ढा यांनी आमच्या प्रभागातील कामे वगळण्यात आल्याची मिश्किल टीका केली. त्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक होत तुम्ही देखील आमच्या प्रभागातील कामे वगळून स्वत:च्याच प्रभागांमधील कामे केली असा पलटवार केला. तसेच महापौर, उपमहापौर हे फक्त प्रभागापुरते नसून संपुर्ण शहराचे असतात मात्र त्यांनी फक्त त्यांच्याच प्रभागातील कामे केल्याचा आरोप डॉ. अश्विन सोनवणे, जितेंद्र मराठे यांनी केला. त्यावर बोलतांना ‘आमदार हे देखील संपुर्ण शहराचे असतात त्यामुळे त्यांनी देखील सर्व शहराचा विचार केला पाहिजे’ असा टोला लगावला.
गटारींच्या तरतुदीवरून वादंग
ॲड. शुचिता हाडा यांनी आपल्या प्रभागातील गटारींची दुरवस्था झाली असून वारंवार सांगून देखील कामे होत नाहीत, आणि ठरावीक नगरसेवकांच्या वार्डांतील कामे पटापट होतात, आता गटारींची तरतुद एका महिन्यात संपली मग आम्ही काय? पुढच्या वर्षांची वाट बघायची का? असा सवाल उपस्थित केला. आम्ही सभ्य भाषेत बोलतो म्हणून आमची कामे होत नाही व जे दुकान मांडून बसतात त्यांचीच कामे होत असल्यामुळे यापुढे आम्हालाही दादागिरीच्या भाषेत बोलावे लागेल का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच नगरसेविका दिपमाला काळे यांनी देखील त्यांच्या प्रभागातील छोटी छोटी कामे होत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर नितीन लढ्ढा यांनी गटारींची तरतुद वाढवून घेवू असे सांगितले.
*** शंभर कोटीतून मिळाले फक्त ९ कोटी
आमच्या सरकारने आधी २५ कोटी दिले त्यानंतर १०० कोटी दिले आता पुन्हा शंभर कोटी रूपयांचा निधी दिल्याचे डॉ. अश्विन सोनवणे यांनी सभागृहात सांगितले. त्यावर ठाकरे गटाचे नगरसेवक अनंत जोशी यांनी जळगाव शहरातील विविध विकास कामांसाठी सन २०१८ मध्ये नगरोत्थान योजनेतून १०० कोटींच्या निधीला तत्वत: मान्यता मिळाली होती. त्यापैकी २०१९ मध्ये ३८ कोटीला मंजुरी मिळाली असून आतापर्यंत फक्त ९ कोटी रुपये राज्य शासनाकडून मिळाले असल्याचे सांगत पलटवार केला.