जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | लाचखोरीची एक मोठी बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील देवगाव पारगावचा ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (39) याला पाच हजार रुपयाची लाच घेताना जळगाव एसीबीने अटक केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील 33 वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदारांचे पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदारांनी दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. संशयित आरोपी ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय 39) यांनी वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. केलेल्या कामाचा मोबदला व बक्षीस म्हणून तक्रारदारांकडे साडेसाह हजार रुपयांची लाच मागण्यात आली व पाच हजारात तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवला.

तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला. बुधवार, 31 जानेवारी रोजी दुपारी पंचांसमक्ष लाच ग्रामसेवक सोनवणे यांनी स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.. त्यांच्याविरोधात अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.







