⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । गणेशोत्सव खऱ्या अर्थाने समाजासाठी साजरा करायचा उत्सव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा राजा स्नेहल प्रतिष्ठानतर्फे २१ वर्षाची परंपरा अबाधित राखत यंदा देखील विविध समाज प्रबोधनात्मक उपक्रम साजरे केले जाणार आहे. सलग ७ दिवस दररोज दुपारपासून संगीतमय श्री शिव महापुराण, संगीतमय सुंदरकांड आणि नामांकित किर्तनकारांचे प्रवचन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. समस्त जळगावकर भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन स्नेहल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य देसाई यांनी केले आहे.

पिंप्राळा येथील आर.एल.कॉलनीतील स्नेहल प्रतिष्ठानचे यंदाचे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी आगळीवेगळी परंपरा जपणाऱ्या स्नेहल प्रतिष्ठानतर्फे यंदा देखील ७ दिवस विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१ सप्टेंबरपासून ह.भ.प. गौप्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांची दुपारी २ ते ५ श्री शिव महापुराण कथा होणार आहे. कार्यक्रमांसाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून भाविकांसाठी पंख्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. दि.३१ रोजी दुपारी ३ पासून श्रींचा आगमन सोहळा सुरू होणार आहे.

दि.१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून सालासर भक्त मंडळाचे संगीतमय सुंदरकांड, दि.२ रोजी बाल कीर्तनकार चैतन्य महाराज राऊत, आळंदीकर यांचे कीर्तन, दि.३ रोजी हभप साध्वी दुर्गादीदी महाराज बिडकीनकर, दि.४ रोजी हभप ज्ञानेश्वर माउली महाराज वाबळे आळंदीकर, दि.५ रोजी हभप धनश्रीताई महाराज भडगावकर, दि.६ रोजी हभप गंगाराम महाराज राऊत पैठणकर, दि.७ रोजी हभप गौप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर यांचे कीर्तन, प्रवचन दररोज रात्री ८ वाजता होणार आहे.

स्नेहल प्रतिष्ठानतर्फे भाविकांसाठी योग्य व्यवस्था आणि नियोजन करण्यात आले असल्याने पावसामुळे कोणताही कार्यक्रम रद्द होणार नाही. सलग ९ वर्षापासून समाज प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करणारे जळगाव जिल्ह्यातील स्नेहल प्रतिष्ठान हे एकमेव मंडळ आहे. मंडळाचा पिंप्राळ्याचा राजा म्हणून नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. जळगाव शहरातील मुख्य सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पिंप्राळा परिसरातून सहभागी होत असलेले स्नेहल प्रतिष्ठान हे एकमेव मंडळ आहे. दि.९ रोजी दुपारी १ वाजेपासून भव्य विसर्जन सोहळा आणि मुख्य सार्वजनिक मिरवणूक काढली जाणार आहे. संपूर्ण उपक्रमांसाठी स्नेहल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य देसाई यांच्यासह सर्व सदस्य, मार्गदर्शक आणि सहकारी परिश्रम घेत आहेत. समस्त जळगावकर नागरिकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे