वरणगावातील वीजपुरवठा सुरळीत करा : शिवसेना
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । वरणगाव शहरात गणेश उत्सवात वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून कोणतीही पूर्व सूचना न देता वीज खंडित होत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन घोषणाबाजी केली. गणपती काळात वीजपुरवठा सुरळीत नाही ठेवल्यास अभियंता यांना काळे फसण्याचा इशारा शिवसेनेतर्फे महावितरणला नुकत्याच देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे.
सध्या गणपती उत्सव सुरू असून या उत्सवात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सायंकाळी गणपती बघण्यासाठी महिला-पुरुष, लहान मुले घराबाहेर पडल्यानंतर त्यांची गैरसोय होते शिवाय रात्रीच्या वेळी गणपतीची आरती करण्याची वेळ आणि वीज नसते. या प्रकारामुळे शहरातील जनता त्रस्त झाली आहे. ऐन सन उत्सवात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा थांबवावा अन्यथा महावितरणच्या अभियंत्यांना काळे फासण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, अल्पसंख्यांक संघटक शेख सईद, माजी उपशहर प्रमुख सुनील भोई, सुनील देवघाटोळे, कृष्णा पूजारी, राहुल वंजारी, वैभव लोखंडे, दीपक शेडके यांची स्वाक्षरी आहे.