⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता ; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । महाराष्ट्रात सध्या ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळतोय. काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे तर काही जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम आहे. दरम्यान, राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट 20 मेपर्यंत कायम असून आज शुक्रवारी जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.

जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.