⁠ 
रविवार, मे 19, 2024

अनाथांची माय काळाच्या पडद्याआड, सिंधुताई सपकाळ यांचं निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या.

त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1 हजार 50 मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केलीय.

हे देखील वाचा :