फुलगावात विरोधक चितपट! ४८ मतांनी श्याम फुलगावकर पुन्हा ठरले ‘सरपंच’; गावात उधळला गुलाल

जून 7, 2026 12:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राजकारणाचा आखाडा बनलेल्या भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांना जनतेनेच आस्मान दाखवले आहे! थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच श्याम फुलगावकर यांना खुर्चीवरून खाली खेचण्याचा ९ विरोधी सदस्यांचा कुटिल डाव ग्रामस्थांनीच उधळून लावला आहे. शुक्रवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत ४८ मतांच्या फरकाने अविश्वास ठराव फेटाळून लावत फुलगावकर यांनी आपला गड मोठ्या दिमाखात राखला आहे. या विजयामुळे गावात समर्थकांनी एकच जल्लोष केला असून, विरोधकांच्या पायाखालची वाळू मात्र सरकली आहे.

shyam fulgaonkar

​असा रंगला मतदानाचा थरार…
विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच फुलगावकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. ५) गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तब्बल १ हजार ४४२ ग्रामस्थांनी उपस्थिती लावत आपला कौल दिला. गुप्त मतदान प्रक्रियेने अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले.

​जेव्हा मतपेट्या उघडल्या, तेव्हा धाकधूक वाढली होती. पण जनतेचा कल स्पष्ट होता. एकूण वैध मतांपैकी सरपंच श्याम फुलगावकर यांच्या बाजूने ‘विश्वास’ दर्शवणारी ७७२ मते मतपेटीतून बाहेर आली. तर, विरोधकांच्या ‘अविश्वास’ प्रस्तावाच्या बाजूने ७२४ मते पडली. प्रक्रियेत ४६ मते बाद ठरली. अखेर अत्यंत अटीतटीच्या या लढतीत ४८ मतांची निर्णायक आघाडी घेत श्याम फुलगावकर यांनी अविश्वास ठराव धूळ चारून विजयी मुसंडी मारली.

​राजकीय द्वेषातून विकासाला खोडा!
विजयानंतर बोलताना सरपंच श्याम फुलगावकर यांनी विरोधकांचे वाभाडे काढले. “ग्रामस्थांनी मला थेट सरपंच म्हणून निवडून दिले आहे, मात्र गावातील काही राजकारण्यांना माझा आणि गावाचा विकास डोळ्यात खूपत आहे. निव्वळ राजकीय द्वेषापोटी पाच वर्षे काम करू न देता हा अविश्वास ठराव आणला गेला,” असा घणाघात त्यांनी केला.

​दोन वर्षांत १२ ग्रामसेवकांच्या बदल्या!
विरोधकांच्या दबावाचे धक्कादायक वास्तवही यावेळी समोर आले. गावात कुठलाही ग्रामसेवक टिकू दिला जात नाही, सततच्या त्रासामुळे गेल्या दोन वर्षांत तब्बल १२ ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत, असा गंभीर आरोप फुलगावकर यांनी केला. तसेच, गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असूनही, केवळ विरोधकांच्या अडथळ्यांमुळे आणि ग्रामसेवक नसल्यामुळे विकासाची कामे रखडल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.

आता उर्वरित कार्यकाळ ‘निर्धोक’
सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या विरोधकांना ग्रामस्थांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार, लोकनियुक्त सरपंचावर एकदा आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास, पुढील दोन वर्षे आणि कार्यकाळाचे शेवटचे ६ महिने पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. त्यामुळे सरपंच श्याम फुलगावकर यांचा उर्वरित पूर्ण कार्यकाळ आता पूर्णपणे ‘निर्धोक’ झाला असून, विरोधकांचे मनसुबे कायमचे धुळीस मिळाले आहेत. ​या झणझणीत विजयानंतर फुलगावमध्ये आता केवळ ‘विकासाचीच’ चर्चा रंगणार असून, सरपंच फुलगावकर नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories