जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । सध्याच्या काळात धूम्रपान, मद्यपान ही फॅशन झाली आहे. तरुण वर्ग धूम्रपानाच्या जास्त आहारी जात असल्याचे अनेक वेळा दिसून येत.धूम्रपानामुळे आरोग्य बिघडू शकतं याकडे दुर्लक्ष केलं जाते. धूम्रपान करू नये अश्या प्रकारच्या अनेक जाहिराती टीव्हीवर दाखविल्या जात असल्या तरी बरेच जण याकडे मात्र सोयीने दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. जर तुम्हीही धूम्रपान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
कारण धूम्रपानाच्या दुष्परिणामाविषयी आजपर्यंत अनेकवेळा संशोधन झालं आहे. त्यातून या व्यसनाचे धोके स्पष्ट झाले आहे. आता अशातच एका नवीन संशोधनातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. धूम्रपानामुळे मेंदूवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, असं हे नवीन संशोधन सांगतं. या संशोधनाच्या निष्कर्षासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.
काय परिणाम होऊ शकतो..
धूम्रपान हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, हे आपण जाणतो. या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे फुफ्फुसावर गंभीर परिणाम होतो. पण आता या संदर्भात नव्याने संशोधन करण्यात आले आहे. धूम्रपानामुळे मेंदू डॅमेज होऊ शकतो. रोज धूम्रपान केलं असता मेंदूचा आकार लहान होऊ शकतो, असं संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे तातडीने धूम्रपान थांबवणं गरजेचे आहे.
नवीन संशोधनात काय म्हटलं आहे?
नवीन संशोधनानुसार, रोज धूम्रपान करणाऱ्यांचा मेंदू कधीही धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा 0.4 क्युबिक इंच लहान असतो. यासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमधील लोकांच्या मेंदूच्या स्कॅनचे आणि त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीचे विश्लेषण केलं. या संशोधनात सहभागींचे 2006 ते 2010 आणि 2012 ते 2013 दरम्यान सर्वेक्षण केले गेले. दुसऱ्या टप्प्यात त्यांचा एमआरआय करण्यात आला. ज्या लोकांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही त्यांच्या मेंदूचा आकार सामान्य असल्याचे एमआरआय चाचणीतून दिसून आले. या चाचणीत धूम्रपान करणाऱ्यांच्या मेंदूचा ग्रे भाग 0.3 क्युबिक इंच तर व्हाइट भाग 0.1 क्युबिक इंच कमी झाल्याचे दिसून आले.
सिगारेट ओढण्याची तल्लफ दूर ठेवण्यासाठी स्वतःला कामात गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. धूम्रपानापासून दूर राहण्यासाठी तुम्ही निकोटिन पॅचेसचा वापर करू शकता. धूम्रपानसाठीचे ट्रिगर्स कोणते हे शोधून ते टाळण्याचा प्रयत्न करू शकता.
दरम्यान, सेलेब्रल अॅट्रॉफी अर्थात मेंदू संकुचित होणं ही क्रिया वयापरत्वे होत असते. त्याची काही लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात. यात स्नायूंवरील नियंत्रण जाणं, दृष्टी अंधूक होणं, दिशाहिनता, स्नायू अशक्त होणं, अल्झायमर विकार होणं, समन्वयाचा अभाव या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे धूम्रपानाचे व्यसन सोडणे गरजेचं आहे. यामुळे मेंदूशी संबंधित विकारांचा धोका कमी होऊ शकतो.