जळगाव लाइव्ह न्यूज | २२ डिसेंबर २०२५ | शहरात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच प्रभाग क्रमांक ७ मध्ये मात्र भक्तीचे वारे जोरात वाहत असल्याचे चित्र काल दिसून आले. समाजसेवक भिकन मुरलीधर हिवराळे आणि शिवकॉलनी परिसर मित्र मंडळ आयोजित भव्य कीर्तन सोहळ्याला शिवकॉलनीकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी गणेश कॉलनी चौकात जनसागर लोटला होता.

या भव्य सोहळ्याला जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्यासह नानाभाऊ सोनवणे, माजी नगरसेविका दीपमाला काळे, राखी सोनवणे आणि अनिता सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या खास विनोदी आणि रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. “संसारात राहून परमार्थ कसा साधावा,” याचे बाळकडू त्यांनी आपल्या कीर्तनातून दिले. त्यांची शैली आणि विचारांनी तरुणाईसह महिला वर्गाची मने जिंकली.
कार्यक्रमाची भव्यता आणि अत्यंत शिस्तबद्ध नियोजन पाहून आमदार राजूमामा भोळे आणि इतर मान्यवरांनी आयोजक भिकनभाऊ हिवराळे यांचे विशेष कौतुक केले. “तरुणांना आणि समाजाला एकत्र आणून चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे,” अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक भिकनभाऊ हिवराळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाप्रसादाने या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता झाली.











