⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

‘त्या’ यादीत नाथाभाऊंचे नाव आहेच ; संजय राऊतांचा दावा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । विधान परिषदेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून राज्य मंत्रिमंडळानं १२ आमदारांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहेत. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे नाव असल्याचा दावा शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. दरम्यान, काल शुक्रवारी चोपड्यातील एका हॉटेलमध्ये रावेर लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकारी मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी का जाहीर होत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, , तुम्हीच जळगाव जिल्ह्यात राज्यपालांना बोलवा आणि विचारा, त्या बारा जणांमध्ये तुमच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील असल्याचे राऊत यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, विलास पारकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ आदी मंचावर उपस्थित होते.

मुक्ताईनगरप्रमाणे जामनेरातही भगवा फडकवणार

मुक्ताईनगरात भगवा फडकल्यानंतर आता जामनेरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आणण्या साठी जोमाने काम करणार आहे. ज्यांनी शिवसैनिकांना त्रास दिला आहे त्यांना सोडणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

संघटनात्मक बांधणीसाठी दौरा

खासदार राऊत म्हणाले की, राज्यात सत्ता असली तरी संघटनेला बळ देणे, गावातला शिवसैनिक काय करत आहे, हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे हे आमच्यासारख्या नेत्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार हा दौरा करत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे. शिवसैनिकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा असल्याचेही शेवटी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.