जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । एरंडोल तालुक्यात किरकोळ अपवाद वगळता जवळपास संपूर्ण शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश जगन्नाथ महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
विशेष म्हणजे, एरंडोल येथील तालुका शिवसेनेचे कार्यालयावर आमचा ताबा आहे. गावागावात भांडणे लावण्याचे राजकारण सुरू असून शिवसेनेत फोडाफोडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही रमेश महाजन व शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी यांनी केला आहे. ज्या बाळासाहेबांनी चिमणराव पाटील यांना विधानसभेची तीनदा उमेदवारी दिली व त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तीनदा उमेदवारी दिली, पैकी चिमणराव पाटील हे तीनदा निवडून आले व तीनदा पराभूत झाले, असे असले तरी उद्धव ठाकरे ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले. त्या दिवशी चिमणराव पाटील हे गुवहाटीला मौज मजा करीत होते. अशी टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांना समर्थन देणाऱ्या नेत्यांमध्ये जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, हिम्मतराव पाटील, महिला आघाडी प्रमुख महानंदाताई पाटील, जिल्हा परिषद चे माजी सदस्य नानाभाऊ महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, उपप्रमुख संजय तोताराम पाटील, कमलेश पाटील, माजी सभापती शांताबाई महाजन, दिलीप रोकडे, दत्तू पाटील, अनिल महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, संजय पाटील, विवेक पाटील, लहू महाजन आदीसह तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच इतर संस्थांचे पदाधिकारी व शिवसैनिक यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.
..तर मी राजकारणातून संन्यास घेईल!
आमदार चिमणराव पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करून आम्ही त्यांचा वचपा काढून जर ते विधानसभा निवडणुकीत निवडून आले तर मी राजकीय संन्यास घेईल अशी घोषणा शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी यांनी यावेळी बोलताना केली.