⁠ 
सोमवार, मे 20, 2024

ब्रिटिशांमुळे उभारले गेले आहे जळगावमधील शास्त्री टॉवर; वाचा काय आहे इनसाईड स्टोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात दिमाखात उभ्या असलेल्या टॉवरच्या निर्मितीचा भलामोठा रोचक इतिहास आहे. खरे पाहता आजचे जळगाव ८ किलोमीटर चौफेर विस्तारलेले असले तरी पूर्वी मात्र टॉवर चौकापर्यंतच वस्ती होती. आजचे लालबहाद्दूर शास्त्री टॉवरची स्थापना तत्कालीन नपाने केली असली तरी त्याची मूळ संकल्पना ब्रिटिशांची होती. भारतातील महत्वाच्या ठिकाणी घड्याळाचे टॉवर उभारण्यात आले असून त्यांचे स्वरूप भव्य दिव्य असेच आहे. जळगाव शहरात उभारण्यात आलेले टॉवर १० मजली उंच असून त्यात अवजड मशिनरी बसविण्यात आली आहे.

घड्याळांचे मनोरे शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य चौकात उभे करण्याची संकल्पना ब्रिटिशांनी भारतात आणली. भारतातील महत्त्वाच्या क्लॉक टॉवरमध्ये मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर, घड्याळ गोदी, हुसेनाबाई क्लॉक टॉवर (लखनऊ), चौरा बझार क्लॉक टॉवर (हैदराबाद), देहरादून क्लॉक टॉवर, घंटा घर (मिर्झापूर), घंटा घर (जोधपूर), मिंट क्लॉक टॉवर (चेन्नई), क्लॉक टॉवर (म्हैसूर) यांचा समावेश आहे. अशाच महत्त्वाच्या टॉवर्समध्ये जळगाव येथील शास्त्री टॉवरचा उल्लेख केला जातो. जळगावच्या टॉवरची देखील आपली वेगळी ख्याती आहे. जळगावात खरेदीनिमित्त आलेल्या प्रत्येकाची नजर टॉवरवर गेल्याशिवाय राहत नाही.

शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणून शास्त्री टॉवर चौकाची ओळख आहे. जळगाव शहरातील जेष्ठ नगरसेवक वामनराव खडके यांनी दिलेल्या माहितीनुसार लालबहाद्दूर शास्त्री टॉवरची उभारणी साधारणतः १९६० मध्ये झाली असावी. तत्कालीन लोकप्रतिनिधी पंडितराव कोल्हे, भिकमचंद जैन, सीताराम चौधरी यांनी टॉवरच्या उभारणीत पुढाकार घेतला होता. जळगाव शहरातच नव्हे जिल्ह्यात १० मजली इमारत उभारून टॉवर निर्माण करण्यात आले होते. टॉवरच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घड्याळाचे डायल १२ फूट आहे. घड्याळाचा मोठा काटा ६ फूट लांब आणि लहान काटा ५.५ फूट लांब आहे. घड्याळाची वाइंडिंग चेन ही ७२ फूट लांबीची आहे. घड्याळाला ऊर्जा देण्यासाठी २०० किलो वजनाच्या चार तबकड्या आहेत. घड्याळात पितळ्याचे चाक असून दर आठ दिवसांनी घड्याळाला चावी द्यावी लागते.

अनेक वर्ष सुरळीतपणे जळगावकरांना आणि शहरात खरेदीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना अचूक वेळ दाखविण्याचे कार्य या घड्याळाने केले आहे. टॉवरच्या खालील बाजूला लालबहाद्दूर शास्त्री यांचा पुतळा असून टॉवरला देखील लालबहाद्दूर शास्त्री यांचे नाव देण्यात आले आहे. मध्यंतरी गेली अनेक वर्षे घड्याळ बंद होते. जळगावातील स्थानिक कारागिरांना ते काम जमणार नसल्याने जैन उद्योग समूहाने पुढाकार घेतला. दुरुस्तीनंतर घड्याळ पुन्हा पूर्ववत सुरु आहे. काही वर्षापूर्वी टॉवरला रंगरंगोटी करण्यात आल्यानंतर पुन्हा नवा साज आला होता. सध्या घड्याळ बंद असले तरी दरवर्षी विशेष दिवशी टॉवरच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.