जळगाव लाईव्ह न्यूज । जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, याचा प्रत्यय जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे आला आहे. येथील एका वीटभट्टी मजुराच्या मुलीने पोलीस दलात शिपाई म्हणून यश संपादन केलं आहे. शाईस्ता दादाराव तडवी असे या होतकरू तरुणीचे नाव आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, हिवरखेडा गावाला आपली पहिली महिला पोलीस मिळाली आहे.

शाईस्ता यांचे वडील वीटभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात सात बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार. आर्थिक ओढाताण पाचवीला पुजलेली असतानाही शाईस्ताने आपले ध्येय डगमगू दिले नाही. खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने रात्रं-दिवस अभ्यास आणि मैदानी सराव केला. तिच्या या यशाने हे सिद्ध केले की, परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद जिद्दीमध्ये असते.

गावातून भव्य मिरवणूक
शाईस्ताची पोलीस दलात निवड झाल्याची बातमी गावात धडकताच गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. संपूर्ण गावात गुलालाची उधळण करत वाजत-गाजत तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी शाईस्ताचे औक्षण करून तिचे जंगी स्वागत केले.
गावासाठी अभिमानाचा क्षण
हिवरखेडा गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान शाईस्ताने मिळवला आहे. “मजुराच्या मुलीने इतिहास रचला,” अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर मुलींनाही शिक्षणाची आणि स्पर्धा परीक्षेची नवी उमेद मिळाली आहे.











