⁠ 
शनिवार, मे 18, 2024

कृषी विज्ञान केंद्रात माहिती अधिकार चर्चासत्र संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जळगाव येथे स्थापन कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद , तेलबिया संशोधन केंद्र व कृषी तंत्र विद्यालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता माहिती अधिकार अधिनियम 2005 ची सुयोग्यरीतीने अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला, कार्यशासाठी प्रमुख मार्गदर्शक माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे व पाचोरा तालुका अध्यक्ष पंकज पाटिल यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्र जळगावचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती , कृषी तंत्र विद्यालयाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. योगेश पाटिल , तेलबिया संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. के. टी. सूर्यवंशी , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे , पाचोरा तालुकाध्यक्ष पंकज पाटिल हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मांडतांना डॉ. हेमंत बाहेती म्हणाले की , अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्यास माहिती अधिकाराचा योग्य उपयोग करत नागरिक व अधिकारी यांच्यात समन्वय साधला जाईल व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये या कायद्याविषयी जनजागृती होऊन भिती कमी होईल . तसेच कृषी विज्ञान केंद्र जळगाव हि तदर्थ योजना असतांना देखील क्षेत्रीय कार्यालय म्हणुन विद्यापीठ प्रशासनामार्फत स्वतंत्र जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांना पदनिर्देशित करण्याकरीत अमोल कोल्हे यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याने डॉ. बाहेती यांनी कोल्हे यांचे विशेष आभार मानले . सार्वजनिक प्राधिकरण व त्याच्या जबाबदाऱ्या , माहितीचा अधिकार अधिनियम 2005 शासन आदेश परिपत्रके आणि महत्वपूर्ण न्याय निर्णय याविषयी अमोल कोल्हे यांनी सविस्तर माहिती सांगितली . तसेच सर्व शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींचे तंतोतंत पालन केल्यास व एक अर्जदाराने विचारलेली माहिती कार्यालयात जाहिर केल्यास शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या अर्जांची संख्या खुप कमी होईल तसेच या कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे हि शासकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे , त्यामुळे नागरीकांशी सौजन्याने वागल्यास अधिकाऱ्यांना शासकीय योजना अधिक कार्यक्षमतेने योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांची मदत घेता येईल असे प्रतिपादन अमोल कोल्हे यांनी केले . कार्यशाळे करिता उपस्थित जन माहिती अधिकारी यांना माहिती पुस्तिकेचे वितरण देखील अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले .

पंकज पाटील यांनी माहिती अधिकार कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या संकल्पना त्या अंतर्गत नियम व जन माहिती अधिकारी यांची कार्यपद्धती व अधिकारी , कर्मचारी तसेच सुज्ञ नागरी नागरिक यांच्या समन्वय साधून शासकीय कार्यालयाचे काम अधिकाधिक लोकाभिमुख कसे करता येईल याविषयी आणि माहिती अधिकार अधिनियमातील विविध कलमांविषयी मार्गदर्शन केले . तद्नंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे समाधान देखील अनिल कोल्हे व पंकज पाटिल यांनी चर्चा सत्रात केले .सदर कार्यशाळे करिता कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक माहिती अधिकारी संदीप गायकवाड , जन माहिती अधिकारी किरण जाधव , कृषी तंत्र विद्यालय चे सहाय्यक जन माहिती अधिकारी गावंडे , तेलबिया संशोधन केंद्राचे सहाय्यक माहिती अधिकारी टिकार तसेच या तिन्ही केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शंका समाधान करून घेतले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. हेमंत बाहेती यांनी केले. सूत्रसंचालन किरण मांडवडे तसेच आभार प्रदर्शन वैभव सूर्यवंशी यांनी मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.