जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय (प्रगती) अभियान स्पर्धेत पारोळा येथील शहर तलाठी निशिकांत माने (पाटील) यांनी सहभागी होत स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक मिळवण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकीकरणामुळे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखपणा व निर्णयशीलता आणण्यासाठी तसेच सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा सन २०२१ पासून नव्याने सुरू केली आहे. त्यात शहर तलाठी निशिकांत पाटील यांनी स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. १८ रोजी शासनाच्या परिपत्रकानुसार शहर तलाठी निशिकांत माने (पाटील) यांची अभियान स्पर्धेत निवड करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कौतुक
स्पर्धेत जिल्ह्यातून एकमेव शहर तलाठी निशिकांत माने (पाटील) यांनी सहभाग घेतला. त्यांच्या निवडीने नाशिक विभागात जिल्ह्याची मान उंचावल्याने त्यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.